Tuesday, 12 April 2016

अंटार्क्टिका : सफर एका अनोख्या विश्वाची


अंटार्क्टिका... अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सात खंडांपैकी एक खंड. भारतासारखे जवळजवळ पाच देश मावतील एवढा हा प्रचंड मोठा प्रदेश. या खंडाचे एकूण क्षेत्रफळ १,४०,००,००० वर्ग किलोमीटर इतके आहे. या खंडाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा खंड चारही बाजुंनी संपुर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आणि यावर फक्त आणि फक्त बर्फाचं साम्राज्य आहे. याच खंडावर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव देखील आहे. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका प्रसिद्ध आहे. वास्तवात अंटार्क्टिका म्हणजे एक मोठं - महाकाय बेटच आहे. चारही बाजुंनी पाण्यानी वेढलेलं. हो पण इथे जमीन आणि पाण्याचं नातं फार वेगळं आहे. हिवाळ्यामध्ये तापमान सतत उणे असल्यामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यापासुन एक ते दीड हजार किलोमीटर पर्यंत गोठतं आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं. यामुळे अंटार्क्टिकाचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट होऊन जाते. पुन्हा मग जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ वितळुन पुन्हा त्याचे पाण्यात रुपांतर होते.



अंटार्क्टिकाचा भौगोलिक नकाशा

अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यात दक्षिण ध्रुवावर तब्बल सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा अंधार असतो. त्याचप्रकारे उन्हाळ्यात दक्षिण ध्रुवावर बाकीचे सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा उजेड असतो. पृथ्वी तिच्या अक्षापासुन २३.५ अंश झुकलेली असल्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा सुर्य प्रकाश इथे कमी पोहोचतो तसंच जो काही प्रकाश या जमिनीवर म्हणजेच बर्फावर पडतो तो पुन्हा आकाशाकडे परावर्तित केला जातो. त्यामुळे इथे बर्फ वितळण्याचं प्रमाण हे बर्फ तयार होण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटींनी कमी आहे आणि म्हणूनच बर्फाचा थर साल दरसाल वाढला गेला आहे. हा बर्फाचा थर सरासरी दोन किलोमीटर एवढा आहे. काही ठिकाणी तर हा थर साडेचार किलोमीटर पर्यंत आढळून आला आहे. अंटार्क्टिकामध्ये किती प्रमाणात बर्फ आहे हे जर उदाहरणासहित सांगायचं झालं तर समजा, जर हा पुर्ण बर्फ भारतावर आणुन टाकला तर संपुर्ण भारताची उंची तब्बल ११ किलोमीटरने वाढेल म्हणजे भारतातील कुठलंही ठिकाण हे सद्यस्थितीचे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच होईल.

हे महाद्वीप जवळपास गोलाकार आहे पण सर्व ठिकाणी पठारासारखं सपाट नाही. जसजसे आपण किनाऱ्याकडुनदक्षिण ध्रुवाकडे सरकत जातो तसतशी याची उंची वाढत जाते. अंटार्क्टिकाच्या पुर्व भागात १००० किलोमीटर व्यासाच्या वर्तुळामध्ये विस्तीर्ण असे एक पठार पसरलेले आहे, ज्याची सरासरी उंची ३००० मीटर म्हणजेच जवळजवळ १०००० फुट इतकी आहे. भारतामध्ये जसं उंच शिखर आहे कांचनगंगा, महाराष्ट्रात जसं उंच शिखर आहे कळसुबाई तसंच अंटार्क्टिकामध्ये असणाऱ्या सर्वात उंच शिखराचे नाव आहे 'विंसन पर्वत'. या विंसन पर्वताची उंची ४८९२ मीटर इतकी आहे. तर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव २८३० मीटर उंचीवर आहे. जगात असणाऱ्या बेटांची उंची हि सरासरी ५०० ते ७०० मीटर आहे. त्याप्रमाणात अंटार्क्टिकाची सरासरी उंची २३०० मीटर इतकी आहे आणि म्हणूनच अंटार्क्टिका जगातील सर्वात उंच महाद्वीप आहे. हो पण हेही खरं आहे की अंटार्क्टिकाची उंची हि फक्त इथे असलेल्या बर्फामुळेच आहे.



चारही बाजुंनी पाण्याने वेढलेलं महाद्वीप - अंटार्क्टिका

अंटार्क्टिकामध्ये उणे तापमान ही सर्वसाधारण व नित्याची बाब आहे. उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात तापमान सरासरी ० ते ५ किंवा ७ अंश सेल्सियसपर्यंत जाते पण हेच तापमान हिवाळ्यात -४० अंश सेल्सियस पर्यंत जाऊन पोहोचते. आतल्या भागात म्हणजेच पठारी आणि पर्वतीय क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये तापमान -२० ते -३५ अंशसेल्सियस इतके असते तर हेच तापमान हिवाळ्यात -७० ते -८० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचते. जगामध्ये कुठल्याही जागी सर्वात कमी तापमानाची जर नोंद झालेली असेल तर ती झाली आहे अंटार्क्टिकामध्येच. सन १९८३ मध्ये रशियाच्या 'वोस्तोक' नावाच्या संशोधन केंद्रामध्ये जगातील सर्वात कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आणि ते तापमान होतं -८९ अंश सेल्सियस. एवढ्या थंड तापमानामुळे हवेमध्ये पाण्याचं फार कमी असते, सर्व पाणी बर्फ बनुन खाली पडते. पठारी भागात हा बर्फ फार कमी प्रमाणात पडतो, वर्षभरात साधारणत: १० सेंटिमीटर इतकाच. 


अंटार्क्टिका मधील बर्फाच्छादित जमीन


अंटार्क्टिका हे महाकाय वादळांसाठी परिचित आहे. इथे जेवढी थंडी धोकादायक तेवढेच वेगाने धावणारे वारेसुद्धा धोकादायक आहे. या वाऱ्यांना जमिनीवर कशाचाच अडथळा होत नाही. हि वादळं आकाराने एक-एक हजार किलोमीटर एवढी प्रचंड मोठीसुद्धा असतात. या जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान जरी स्थिर असले तरी थंडीची तीव्रता दुपटीने वाढते. अंटार्क्टिकामध्ये काही संशोधन केंद्रामध्ये वाऱ्याचा वेग प्रति ताशी ३०० किलोमीटर नोंदविला गेला आहे. सर्वात जास्त वाऱ्याचा वेग हा जुलै १९७२ मध्ये फ्रान्स देशाच्या संशोधन केंद्रावर नोंदविला गेला आहे. त्यावेळी आलेल्या वादळी वाऱ्याचा वेग होता प्रति ताशी ३२७ किलोमीटर. हे वेगाने वाहणाऱ्या वारे आणि वाऱ्याबरोबर उडणारा बर्फ एवढे प्रचंड असतात की दगडांचा पण त्यांच्यासमोर निभाव लागत नाही. हे वारे अक्षरश: दगडांमध्ये छिद्र करतात आणि काही छिद्र तर आरपारही होऊन जातात.



सततच्या वाऱ्याच्या माऱ्यामुळे छिद्र पडलेला एक दगड

पृथ्वीवर असणाऱ्या उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर म्हणजेच अंटार्क्टिका मध्ये आकाशात एक नैसर्गिक लालसर आणि हिरवट प्रकाश दिसतो. त्याला आपण ध्रुवीय प्रकाश किंवा मेरुज्योती म्हणू. इंग्रजी मध्ये याला अरोरा(Aurora) असं म्हणतात. उत्तर ध्रुवावरील या प्रकाशाला सुमेरु ज्योती (इंग्रजी शब्द : Aurora Borealis) असं म्हणतात तर दक्षिण ध्रुवावरील या प्रकाशाला कुमेरु ज्योती (इंग्रजी शब्द : Aurora Australis) असं म्हणतात. अंटार्क्टिका आणि प्रदूषण यांचा काहीही संबंध नाही, इथे कुठल्याही प्रकारचे वायुप्रदूषण किंवा धुळ नाही. त्यामुळेच अंटार्क्टिका हे अंतराळ निरीक्षणासाठी पृथ्वीवरिल सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.



 कुमेरु ज्योती (Aurora Australis)

इथे कुठल्याही प्रकारची झाडे, वनस्पती नाहीत. ३-४ प्रकारचे पक्षी आढळतात पण तेसुद्धाफक्त समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात. अंटार्क्टिकाची खासियत म्हणजे इथे वास्तव्यास असलेले पेंग्विन पक्षी. पेंग्विन हे समुद्र आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशातच वास्तव्य करतात. पेंग्विन पक्ष्यांच्या एकूण ७ जाती येथे आढळुन येतात. 


 पेंग्विन प्रजातीचा पक्षी - एडेली पेंग्विन

भारताकडुन अंटार्क्टिकामध्ये दोन संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. 'मैत्री' हे केंद्र सन १९८९ पासुन कार्यरत आहे आणि 'भारती' हे आधुनिक सोयी-सुविधांनी अद्ययावत असे संशोधन केंद्र सन २०१२ पासुन कार्यरत आहे.


भारताचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - मैत्री


भारताचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - भारती

अंटार्क्टिकामध्ये स्थायिक मनुष्यवस्ती अशी नाहीच. कारण जगालाच या खंडाची ओळख अवघ्या २०० वर्षांपुर्वी झालीय. त्याआधी माणसाने हा प्रदेश कधीच पाहिला नव्हता. तसं पाहिलं तर अंटार्क्टिकाला स्वतःची अशी लोकसंख्या नाहीच. तसेच इथं कुठली आदिवासी जमात देखिल अस्तित्वात नाही. सद्यस्थिती पाहता इथल्या उन्हाळ्यात सर्व देशांचे मिळुन ४००० लोक संशोधनासाठी कार्यरत असतात आणि हिवाळ्यामध्ये हीच संख्या १००० वर येऊन पोचते. इथे जगातील विविध देशांकडून फक्त वैज्ञानिक संशोधन चालू असते, त्यासाठी विविध देशांचे शास्त्रज्ञ इथे वास्त्याव्यास असतात आणि ते देखील एक ते दीड वर्ष कालावधीसाठीच. 

तर असा आहे अंटार्क्टिका खंड. पृथ्वीवर असलेलं एक वेगळं जग...!