एके दिवशी पूर्वेकडील चीनच्या 'झोन्गशान' नावाच्या केंद्राच्या लीडरचे आमच्या लीडरना स्नेहभोजनासाठी आमंत्रण आले. त्याप्रमाणे आमच्या लीडरने सोबत दहा जणांची निवड केली. समुद्र गाड्या चालवण्यासाठी अजून खुला झाला नव्हता त्यामुळे आम्ही प्रोग्रेस धावपट्टीमार्गे आईस शेल्फवरून जाण्याचा निर्णय घेतला. प्रोग्रेस धावपट्टी हीदेखील आईस शेल्फचाच एक भाग आहे. थोड्या वेळाने आम्ही आईस शेल्फ मागे टाकत डोंगर-दऱ्यांच्या प्रदेशातून जाताना एका घाटमार्गाला लागलो. या छोट्याश्या घाटात एके ठिकाणी मात्र तीव्र चढ होता. त्या चढाजवळ आम्ही निम्मे जण पिस्टनबुलीमधून पायउतार होऊन चालत गेलो. साधारण ५०-६० अंशाचा तो चढ चढून आम्ही उंचवट्यावर आलो. समोर पाहतो तर आहाहाहा ! काय नजारा होता. वाह ! मन अगदी प्रफुल्लित झाले. समोर नुकत्याच गेलेल्या उन्हाळ्यात वेगळे झालेले हिमनग आईस शेल्फपासून दिसत होते. तो क्षण इतका सुंदर होता कि पापण्या झाकतच नव्हत्या. पण तरीही लीडरच्या आदेशानुसार इच्छित स्थळी रवाना झालो.
चीन देशाच्या केंद्रावर जाताना दिसणारा हिमनगांचा परिसर
थोड्याच वेळात आम्ही झोन्गशान केंद्राजवळ पोचलो. चिनी लीडर आणि त्यांचे सदस्य आमच्या स्वागतासाठी दारामध्ये उभे होते. आम्ही वेळ न दवडता लगेचच हस्तांदोलन करून त्यांच्या केंद्रामध्ये प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम ज्यूस देऊन आम्हास त्यांचे केंद्र दाखवण्यास सुरुवात केली. चिनी सदस्यांमध्ये एक-दोन सदस्यांनाच इंग्रजी भाषा बोलता येत होती. त्यामुळे ते दुभाष्याचं काम करत होते. भारती केंद्राच्या बांधणीत आणि या केंद्राच्या बांधणीत असणारा फार मोठा फरक आम्हाला जाणवत होता. चिनी सदस्यांनी त्यांच्या भोजन कक्षामध्ये छान लाल रंगाची सजावट केलेली होती. तो लाल रंग डोळ्यात असा सारखा भरत होता. आम्ही तब्बल पाच महिन्यानंतर बाहेरील माणसांना भेट देत होतो. इतके दिवस आम्ही आमचं बेट सोडून कुठेच गेलो नव्हतो ना कोणी आमच्याकडे आलं होतं. त्यांनी आमच्या पाहुणचारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे, चिकन, मटण तळले होते. ब्रेड, टोस्ट, केक असे बेकरी प्रकारातील खाद्यही होते तसेच मद्यपान करणाऱ्यांसाठी देखील व्यवस्था केली होती. त्यांच्या केंद्रामध्ये भरपेट भोजन घेऊन आणि पाहुणचार घेऊन त्यांनाही भारती केंद्रात येण्याचे निमंत्रण देऊन गेलो त्याच मार्गाने पुन्हा माघारी भारती केंद्रात आलो.
चीन देशाचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - 'झोन्गशान'
त्यानंतर पुढच्या आठवड्यातच रशियन केंद्र - 'प्रोग्रेस' मधून आम्हाला स्नेहभोजनाचं आमंत्रण आले. रशियन आणि चिनी देशांची केंद्रे ही एकमेकांजवळच आहेत, साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर. म्हणून मग आम्ही मागच्या वेळी चीनच्या केंद्रामध्ये गेलेलो त्याच रस्त्याने गेलो. रशियन लीडरनेही दारातच आम्हा सर्वांचे स्वागत केले. यांचेही एक-दोन सदस्यच तोडकं-मोडकं इंग्रजी बोलू शकत होते. भारती केंद्र आणि प्रोग्रेस केंद्र या दोन्ही केंद्राचं परंपरागत एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर आपण एखाद्या मित्राच्या घरी आलो आहोत असा भास झाला. तिथेही आम्ही पूर्ण केंद्राचा फेरफटका मारून थंड पेये घेतली. थोडा वेळ आम्ही तिथे टेबल टेनिसही खेळलो. काही वेळाने दोन-तीन रशियन सदस्यांबरोबर लुडो हा खेळही खेळलो. ना आम्हाला कोणाला रशियन भाषा येत नव्हती ना त्यांना कोणाला हिंदी आणि इंग्रजी. तरीही हा खेळ खेळताना फार गमती-जमती झाल्या. त्यानंतर त्यांनी केलेल्या भोजनाचा आनंद घेऊन भारती केंद्रात माघारी परतलो.
रशिया देशाचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - 'प्रोग्रेस'
जुलै अखेरीस समुद्र चालण्यासाठी किंवा गाड्या चालवण्यासाठी खुला होतो, असा दरवर्षीचा कल असे. पण आमच्या केंद्रामध्ये तशी चाचणी करण्याकरिता काहीच उपकरणे नव्हती. दरवर्षी अशी चाचणी करण्याचा मान रशियन केंद्राला असे. उत्तर रशियामध्ये असेच थंड वातावरण असल्यामुळे रशियन केंद्रातील सदस्य या गोष्टींमध्ये जास्त पारंगत असतात. त्यामुळे एकदा की रशियन सदस्यांच्या गाड्या समुद्रावर फिरताना दिसल्या की, भारती केंद्राच्या गाड्या समुद्रावर प्रवेश करत असत. भारती केंद्र नव्याने सुरु झाल्यापासून हीच परंपरा पडली होती. त्यामुळे आमचे लीडरही वरचेवर रशियन केंद्राशी संपर्क साधत होते.
आणि अचानक एक दिवस कोणाला तरी एक रशियन पिस्टनबुली समुद्रावरून भारती केंद्राकडे येताना दिसली. त्या सदस्याने ही माहिती लगेचच रेडिओ कक्षाकडे पोचवली. मग संपूर्ण केंद्रात ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. थोड्याच वेळात चार रशियन सदस्य केंद्राच्या दारात पोचले. आमचे लीडर स्वतः त्यांच्या स्वागतासाठी गेले. त्यांना भोजन कक्षात नेऊन त्यांचा यथोचित पाहुणचार केला. समुद्रावर गाड्या कुठल्या भागात चालू शकतात, कुठल्या भागात नाही हे सांगायला ते आले होते. त्यामुळे आता आम्हीही आमच्या पिस्टनबुली, स्किडू या गाड्या समुद्रावर घेऊन जाऊ शकणार होतो, यात शंकाच नव्हती.
आणि अचानक एक दिवस कोणाला तरी एक रशियन पिस्टनबुली समुद्रावरून भारती केंद्राकडे येताना दिसली. त्या सदस्याने ही माहिती लगेचच रेडिओ कक्षाकडे पोचवली. मग संपूर्ण केंद्रात ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. थोड्याच वेळात चार रशियन सदस्य केंद्राच्या दारात पोचले. आमचे लीडर स्वतः त्यांच्या स्वागतासाठी गेले. त्यांना भोजन कक्षात नेऊन त्यांचा यथोचित पाहुणचार केला. समुद्रावर गाड्या कुठल्या भागात चालू शकतात, कुठल्या भागात नाही हे सांगायला ते आले होते. त्यामुळे आता आम्हीही आमच्या पिस्टनबुली, स्किडू या गाड्या समुद्रावर घेऊन जाऊ शकणार होतो, यात शंकाच नव्हती.
रशियन सदस्यांची स्वदेशी बनावटीची पिस्टनबुलीसारखी गाडी
रशियन सदस्य येऊन गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारती केंद्राच्या परिसरात एक छोटंसं वादळ आलं. या वादळात वाऱ्याचा वेग अंदाजे पन्नास किमी प्रतितास असा असावा. आधी अनुभवलेल्या वादळापेक्षा फार कमी. पण जो स्नो पसरला होता भारती बेटावर तो पाहून बाहेर जाऊन येऊच म्हटलं जरा. म्हणून आम्ही सहा जण बाहेर पडलो. प्रत्येक वेळी नवीन भासणारा हा परिसर. आपण बाहेर पडायचं, एखाद्या उंचवट्यावर जाऊन शांतपणे सूर्यास्त पहात बसायचं तर कधी हिमनगे मोजत बसायचं. कोणता हिमनग मोठा आहे, कोणता जास्त लांब आहे, हे मोजायचं. मनसोक्त फिरायचं, निसर्गाची नवीन नवीन रूपं नजरेत साठवायची आणि केंद्रात माघारी यायचं.
वादळामध्ये चालत असताना
रशियन सदस्य भारती केंद्रामध्ये येऊन गेल्यापासून गोठलेल्या समुद्रावर कधी जातोय असं झालं होतं. सुदैवाने काल आलेलं वादळ काल रात्रीच शमलं होतं त्यामुळे आज आम्हाला समुद्रावर जाण्यापासून कोण रोखू शकणार नव्हतं. मी, एक आचारी आणि एक इसरोचे शास्त्रज्ञ असे तिघे जण गोठलेल्या समुद्रावर चालायला निघालो. आज आम्ही खूप दिवसाच्या सुट्टीनंतर समुद्रावर चालायला फिरायला जाणार होतो. कधी एकदा समुद्रावर जातोय असं झालेलं. भारती बेटाचा उतार संपवून आम्ही समुद्रावरच्या बर्फावर उतरते झालो. गोठलेल्या समुद्रावर चालत जाण्याची ही या हिवाळ्यातील पहिलीच वेळ असल्याने थोडी भीती वाटत होती. एकेक पाऊल अंदाज घेऊन टाकत होतो. शंभर एक मीटर एकदाचा किनारा सोडून जरा आतमध्ये गेल्यावर मात्र प्रफुल्लित झालो. आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. अंटार्क्टिकामध्ये दृश्यमानता अधिक असल्यामुळे लांबच्या गोष्टीही जवळ भासतात आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आत्ताही आला. भारती बेट आणि त्यासमोरचे बेट यामध्ये बरोबर मध्यभागी जायला आम्हाला आम्ही अंदाज बांधलेल्या वेळेपेक्षा तीनपट वेळ लागला होता. म्हणून जास्त लांब न जाता माघारी फिरून भारती बेटाजवळच येऊन आम्ही फिरू लागलो. सूर्यास्त होत असल्यामुळे आजूबाजूच्या बेटांवर छान तांबडं ऊन पडलं होतं. भारती केंद्रही समुद्रावरून फार वेगळे भासत होते.
समुद्रावरून दिसणारे भारती केंद्र आणि आजूबाजूचा परिसर
या आठवड्यात पहिल्यांदाच या वर्षातील चिनी मोहिमेचे सदस्य आणि रशियन मोहिमेचे सदस्य भारती केंद्रास भेट देऊन गेले होते. त्यांनी आमचा केला तसाच त्यांचा पाहुणचार आम्हीही केला होता. तसेच आमच्याही केंद्रातील राहिलेले सदस्य त्यांच्या केंद्रांना भेट देऊन आले होते. स्वातंत्र्यदिन जवळ येऊ लागला होता. अंटार्क्टिकामध्ये राष्ट्रीय सण साजरी करायची ही माझी दुसरी वेळ होती. याआधी उन्हाळ्यात आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. तीन-चार दिवस आम्ही श्रमदान करून केंद्राचा कानाकोपरा स्वच्छ केला. आदल्या दिवशी सर्वांनी मिळून कार्यक्रमाची रूपरेषाही ठरवली. चिनी आणि रशियन केंद्रांना या सोहळ्यास निमंत्रणही दिले होते. चिनी आणि रशियन सदस्य वेळेत पोहोचले त्यामुळे आम्ही वेळेत म्हणजेच सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण केले. बर्फाळ प्रदेशात तिरंगा फडकावयाचे भाग्य लाभले यामुळे कृतकृत्य झालो. आम्ही उत्तमरीत्या ध्रुवीय रात्री काढल्यामुळे आम्हा सर्व भारतीय मोहिमेच्या सदस्यांना तीनही देशांच्या लीडर्सचे स्वाक्षरी असलेले 'अंटार्क्टिक पोलर एक्सप्लोरर' हे प्रमाणपत्र याच दिवशी देण्यात आले. हे प्रमाणपत्र घेताना आपोआपच अभिमानाने छाती फुलून आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे खाण्या-पिण्याचा कार्यक्रम झाला. चिनी आणि रशियन सदस्यांना भारतीय पद्धतीची मेजवानी खूपच आवडली होती.
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यावर सर्व सदस्यांचे सामूहिक छायाचित्र
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अखेर आमच्या लीडरने आम्हाला हिमनग बघायला जाण्यासाठी परवानगी दिली. या दिवसासाठी आम्ही सर्वजण फार उत्सुक होतो. पिस्टनबुलीमध्ये दरवाजे बंद केल्यावर जास्त गार वाटत नसे आणि मोठी असल्याने कुठे रुतण्याची पण संधी नाही, त्यामुळे आम्ही पिस्टनबुली गाडी सोबत घेऊन जाणे पसंत केले. खाण्यासाठी चिवडा, फरसाण, बिस्किट्स वगैरे तर पिण्यासाठी ज्यूस, पाणी आणि थंड पेये घेतली व उत्तर दिशेला प्रस्थान केले. गेले पाच महिने पाहत आलेलो ती हिमनगे आता आम्हाला जवळ जाऊन पाहायची होती. हिमनग जेवढा आपल्याला वर तरंगताना दिसतो त्याच्या तीनपट तो समुद्राच्या पाण्यात असतो. अंटार्क्टिकामध्ये समुद्राच्या पाण्याचा बर्फ होत असल्यामुळे हे हिमनग हिवाळ्यात एकाच ठिकाणी अडकून पडतात आणि उन्हाळ्यात पाणी वितळले की वारे किंवा पाणी जसं वाहून नेईल तसे वाहत जातात. केंद्रापासून दोन-तीन किलोमीटर लांब आल्यानंतर हिमनगांच्या रांगा सुरु झाल्या. काही हिमनगांवर सूर्यप्रकाश थेट पडत असल्यामुळे बर्फाचा वरचा थर निघून जाऊन ती जागा स्फटिकाप्रमाणे चमकत होती. आम्ही आता या निळ्या बर्फाच्या डोंगरांची मजा घेत होतो. काही हिमनग दहा-अकरा मजल्याच्या इमारतीइतके उंच तर काही तेवढेच लांब आडवे. असा हा अंटार्क्टिकामधील अजून एक चमत्कार आम्ही पाहत होतो.
हिमनग
ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत ऑरोरा दिसायचं प्रमाण कमी झालं होतं. दिसला तरी पुसट पुसट ऑरोरा दिसत असे त्यामुळे या दिवसात आम्ही हिमनगे पाहण्यावरच भर दिला होता. आम्ही तीन-चार, तीन-चार दिवसांच्या अंतराने एकूण पाच वेळा हिमनगे पाहायला गेलो, कधी चालत तर कधी पिस्टनबुलीने तर कधी स्किडूने त्यामुळे भारती केंद्रापासून दहा-बारा किलोमीटरच्या पट्ट्यातले सर्व हिमनग पाहून झाले होते. मध्येच आम्ही चिनी केंद्रावर परत एकदा जाऊन आलो होतो. चिनी केंद्राने आम्हाला आणि रशियन केंद्रातील सदस्यांना बॅडमिंटनच्या स्पर्धा आयोजित करून त्यात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. चिनी केंद्रात बॅडमिंटन खेळण्यासाठी एक प्रशस्त हॉल होता. तिथे त्यांनी एका फलकावर 'हिवाळी खेळ - बॅडमिंटन तिरंगी मालिका (अंटार्क्टिका येथे)' असं लिहून तीनही देशांचे ध्वज लावले होते. अगदी आंतरराष्ट्रीय सामान्यांमध्ये जसं पोषक वातावरण असते तसेच वातावरण तयार झाले होते. आमच्या दृष्टीने तर आम्ही आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत जाऊन केव्हाच बसलो होतो. रशियन सदस्यांनी कडवी टक्कर दिली पण तरीही मालिका थोड्याश्या फरकाने का होईना पण आम्हीच जिंकली. सर्व खेळ झाल्यावर चिनी सदस्यांनी Barbecue ची मेजवानी दिली. मस्तपैकी खाण्या-पिण्याचा कार्यक्रम उरकून आम्ही समुद्रमार्गे भारती केंद्रात माघारी परतलो.
चीन देशाच्या केंद्रामध्ये बॅडमिंटन खेळताना
एके दिवशी सकाळीच लॉजिस्टिक टीमचे चार सदस्य दोन पिस्टनबुली घेऊन समुद्रमार्गे प्रोग्रेस धावपट्टीला सर्वात लांबून जाणारा मार्ग चिन्हांकित (route marking) करण्यासाठी निघाले. मला हे समजताच मी त्यांना भेटून त्यांच्यासोबत येण्याची इच्छा दर्शवली. आम्ही मिळूनच आमच्या लीडरशी बोलून परवानगी मिळवली. मी पटकन तयार झालो आणि लगेचच आम्ही मार्गस्थ झालो. हा मार्ग केंद्राच्या पश्चिम दिशेला जाऊन एका डोंगरावरून दक्षिण दिशेला जातो. ठराविक अंतरानंतर पुन्हा पूर्वेस वळून प्रोग्रेस धावपट्टीला मिळतो. पण हिवाळ्यात आलेल्या वादळांमुळे आणि झालेल्या बर्फवृष्टीमुळे आम्हास हे वळण समजलेच नाही. त्यामुळे आम्ही जिथून पूर्वेकडे वळायला पाहिजे होते तिथे न वळता सरळ दक्षिणेकडे गेलो. दक्षिणेकडे पसरला होता समुद्राइतकाच अथांग आईस शेल्फ. आम्ही खूप लांबवर आलो होतो. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं उंचवटा वाढतच होता. याचाच अर्थ असा होता की आम्ही आईस शेल्फ मागे टाकून एका हिमनदीवर (Glacier) आलो होतो. आम्ही केंद्रापासून अंदाजे वीस किलोमीटर लांब आलो होतो. प्रोग्रेस धावपट्टी तर यापेक्षाही फार कमी अंतरावर होती. आम्ही समजून गेलो कि आम्ही चुकलो होतो. समोर एक टेकडीवजा शिखर दिसत होते. म्हणून मग आम्ही गाड्या थांबवून एकत्र चर्चा केली. आमच्याबरोबर सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या शर्मासाहेबांचं थोडं पुढे जाऊन पाहू असं मत पडलं. आमच्याकडे आता एकच मार्ग होता की आलो तसे परत जायचं किंवा थोडं पुढे जाऊन त्या दिसणाऱ्या शिखरावरून अंदाज घ्यायचा. आम्ही शर्मासाहेबांच्या मतास होकार कळवत गाडीमध्ये बसून त्या शिखराकडे मार्गस्थ झालॊ. मी शर्मासाहेबांच्याच गाडीमध्ये होतो आणि शर्मासाहेब गाडी चालवत होते. थोडं अंतर पुढे जाताच एके ठिकाणी गाडी पुढे आल्यावर शर्मासाहेबांना आरश्यातून मागे बर्फामध्ये एक खड्डा तयार झाल्याचे दिसले म्हणून त्यांनी लगेचच गाडी थांबवली. आम्ही दोघेही काय झालं हे पाहायला गाडीतून उतरलो. गाडी उभी केल्याच्या जागेपासून तीस फूट मागे चालत गेलो तर पाहतो तर काय... आम्ही एका Crevasse (हिमनदीतील मोठी भेग) वरून गाडीसकट पुढे आलो होतो. मागून आमची दुसरी गाडी येताना दिसली तसे लगेचच त्यांना हातवारे करून थांबण्याच्या इशारा केला. त्यांनी लगेच गाडी थांबवून चालत पुढे आले. त्यांनाही क्रेवास पाहून धक्काच बसला. साधारण तीस फूट खोल आणि सात-आठ फूट रुंद असा हा क्रेवास होता. लांबीला तो कमीत कमी पाचशे-सहाशे मीटर होता यात आम्हाला शंकाच नव्हती कारण हिवाळ्यात झालेल्या बर्फवृष्टी आणि कमी तापमानामुळे क्रेवासचे तोंड किंवा त्याची उघडी बाजू पापुद्र्यासारख्या बर्फाच्या थराने झाकली गेली होती. आम्ही आजूबाजूचा बर्फ आणि क्रेवासवरचा बर्फ यात निरखून पाहिले असता हलका फरक जाणवत होता. खरंच तो क्रेवास लांबीला खूप मोठा होता. जसजसं हिमनदी समुद्राच्या दिशेने पुढे सरकते तसे हे क्रेवास रुंद होत जातात. आमच्यासाठी हा अद्भुत पण तितकाच भीतीदायक प्रसंग होता. पण तरीही शर्मासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढेच जाण्याचा निर्णय घेतला. आमची मागची गाडी आम्ही नव्याने खुल्या झालेल्या क्रेवासच्या तोंडापासून तीस-चाळीस फूट लांबून जास्त वेगाने क्रेवासवरून पार केली. आमच्यामधलं वातावरण तणावयुक्त झाले होते पण तसं कोण कोणाला हे जाणवू नये याची खबरदारी घेत होतो. दहा मिनिटातच आम्ही त्या टेकडीवजा शिखरावर पोचलो. पण उत्तरेकडे आम्हाला सूर्यप्रकाशामुळे फक्त बर्फ चमकत दिसत होता. तिकडे लांब दूरवर एक-दोन बेटे आणि हिमनगे दिसत होती. आम्हाला ना प्रोग्रेस धावपट्टी दिसत होती ना भारती केंद्र. आम्ही खूप दूरवर तीस-पस्तीस किलोमीटर दक्षिणेला भरकटलो होतो. त्यामुळे आम्ही हताश झालो. आता आमच्यासमोर एकच पर्याय शिल्लक होता तो म्हणजे आल्या वाटेने माघारी जाणे. आलेली वाट पिस्टनबुलीच्या चाकाच्या पट्ट्यांमुळे पडलेल्या व्रणांमुळे त्या मानाने सोपी होती. या वाटेने आम्ही केंद्रात पोचायला काहीच अडचण नव्हती, अपवाद होता फक्त क्रेवास. क्रेवास पार केला तरच आम्ही केंद्रात जाऊ शकू हे स्पष्ट होते. त्यामुळे आम्ही त्या शिखरापासून क्रेवासजवळ येऊन पाहणी करू लागलो. आता आम्हाला क्रेवासची पूर्ण माहिती झाली होती, तो किती मोठा आहे हे लक्षात आलं होतं. आमच्या दुसऱ्या गाडीतील एक सदस्य पाय आपटून पाहणी करत होता. मी त्याला मागून त्याचा हात धरून आधार देत होतो. एके ठिकाणी त्याने पाय आपटला असता मोठे भगदाड पडले, माझा हाताचा आधार असल्यामुळे तो त्यात जात जाता वाचला. क्रेवासचा वरचा थर इथे अतिशय पातळ होता. सुदैवाने त्याला मी घट्ट पकडू शकलो नाहीतर दोघेही आत पडण्याची शक्यता होती. तणाव अजूनच वाढला. इतक्यात शर्मा साहेबांचा 'वॉकी-टॉकी' वरून संदेश आला कि इकडे या, इथे जरा सुरक्षित वाटत आहे. लगेचच आम्ही ही जागा सोडली. शर्मासाहेबांनी प्रथम एक गाडी त्या सुरक्षित वाटलेल्या जागेवरून पार केली होती. तशीच दुसरी गाडीही थोड्याश्या अंतरावरून पार झाली. आम्ही त्या जागेवरून चालत तो क्रेवास पार केला. जीव भांड्यात पडला. आम्ही तिथेच एकमेकांचे हस्तांदोलन करून गळाभेट घेतली पण तरीही सर्वांच्या चेहऱ्यावरचा तणाव लपत नव्हता. मृत्यूच्या दारातून, समोर उभ्या असलेल्या यमदेवाला हरवून आम्ही परत आलो होतो. प्रोग्रेस धावपट्टीच्या मार्ग पुन्हा कधीतरी चिन्हांकित करू असे ठरविणे आणि हा असा अद्भुत, चित्तथरारक अनुभव घेऊन आम्ही माघारी परतलो.
हिमनदीतील मोठी भेग (Crevasse)
सप्टेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात गणपतीचा सण आला. मी आणि इतर मराठी भाषिक सदस्यांनी आपल्या महाराष्ट्रात जसा साजरा होतो तसा गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले. त्यासाठी सजावट करायला सुरुवात केली. सजावटीचा विषय अर्थातच अंटार्क्टिकाचाच होता. एका पुठ्ठयावर आम्ही कापूस अंथरून त्यावर चार-पाच पेंग्विन्सचे फोटो चिकटवले आणि झाली आमची सजावट पूर्ण. गणपती बसवायच्या दिवशी आम्ही केंद्राबाहेरून केंद्रामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली. गोडाचा नैवेद्यही केला. त्या आठवड्यात आम्ही रोज सकाळी-संध्याकाळी आरती करत असू. असेच दहा दिवसानंतर उत्सव करून अनंतचतुर्दशीला आम्ही गणपतीचे विसर्जनही केले.
अंटार्क्टिकाचीच आरास असलेला अंटार्क्टिकामधील गणपती
(सूचना : अंटार्क्टिकामध्ये आम्ही साजरा केलेल्या गणेशोत्सवावर एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्याचा दुवा पुढे देत आहे. https://maheshantarctician1.blogspot.com/2019/11/blog-post.html)
एके दिवशी चार-पाच अॅडली पेंग्विन समुद्रावर फिरताना आम्हाला दिसले. ते जवळून पाहण्यासाठी आम्ही समुद्रावर गेलो. त्यांच्या शरीरावर इतर पेंग्विन्सप्रमाणे एकही पिवळा पट्टा नसतो. फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हे पेंग्विन्स खूप सुंदर दिसतात. अॅडली पेंग्विन हे जरासे म्हणजे इतर पेंग्विन प्रजातींच्या तुलनेत आक्रमक असतात. त्यांच्यासाठी माणूस म्हणजे कधीही न पाहिलेला प्राणी असतो. आपण जर त्याच्या जवळ गेलो तर कुतुहलापोटी आपल्या जवळ येतो आणि लहान मुलासारखा आपल्याकडे पहात राहतो की अरे हे काय आहे म्हणून.
अॅडली पेंग्विन
आक्रमकता दाखवताना अॅडली पेंग्विन
अंटार्क्टिकामध्ये आल्यापासून आधी ठरवल्याप्रमाणे सर्वच wonders (आश्चर्ये) पाहून झाली होती. आता फक्त एकच महत्त्वाचं ठिकाण पाहायचं बाकी होतं. त्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी म्हणून आम्ही आमच्या लीडरकडे गेले महिनाभर पाठपुरावा करत होतो. नाही नाही म्हणता एक दिवस आम्हाला या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळालीच. हे ठिकाण होतं जगातील सर्वात मोठ्या प्रजातीच्या पेंग्विन पक्ष्यांची प्रजनन वसाहत. जगातील सर्वात मोठ्या पेंग्विन पक्ष्यांची प्रजात ही अंटार्क्टिकामध्येच आहे. ह्या पेंग्विन पक्ष्यांना इंग्रजीमध्ये Emperor Penguin असे नाव आहे. ही वसाहत भारती केंद्रापासून पूर्वेला अंदाजे चाळीस किलोमीटर आहे. इकडे जाताना आम्हाला खूप सारे हिमनग पाहायला मिळाले. या वाटेवर आम्ही इतके सुंदर, इतके भव्य हिमनग पहिले कि आम्ही आधी पाहिलेले हिमनग या हिमनगांपुढे काहीच नव्हते. साधारण दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही वसाहतीजवळ पोहोचलो. निशब्द... काय पहात होतो हे आम्ही. हजारोंच्या संख्येने Emperor Penguins. नर मादी आणि त्यांची ती छोटी छोटी गोंडस पिल्लं. त्या पिल्लांमध्ये तर गोंडसपणा ठासूनच भरलेला. अतिशय भारदस्त, मानेवर पिवळा पट्टा असणारे हे Emperor Penguins खरंच योद्धा, लढवय्या वृत्तीचे असतात. -३० ते -४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये अंटार्क्टिकाच्या समुद्रकिनाऱ्यावर अशा वसाहती स्थापन करून भर हिवाळ्यात ते प्रजनन करतात. एवढ्या कमी तापमानात आणि ऐन हिवाळ्यात अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर राहणारा हा एकमेव पक्षी आहे. त्या दिवशी मन भरून आम्ही पेंग्विन पक्षी पाहिले. डोळ्यांचं पारणं फिटलं. इतका आनंद कि पोटात मावेनाच. आमच्या लीडरने इथे आम्हाला फोटो काढण्यास परवानगी दिली नाही तरीही या खूप छान आठवणी डोळ्यात साठवून माघारी परतलो. केंद्राकडे परत येत असताना सील प्राणी समुद्रावर गोठलेल्या बर्फावर पहुडलेले दिसले. त्यातील एका मादीने तर नुकताच एक-दोन दिवसांपूर्वी एका पिल्लाला जन्म दिला होता. अतिशय गोंडस दिसत होता तो छोटा सील.
Emperor पेंग्विन
हिमनगाबरोबर सूर्यास्ताच्यावेळी Emperor पेंग्विन
आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लासोबत मादी सील
ऑक्टोबर महिना संपत आला होता. आम्ही अजूनही समुद्रावर जाऊ शकत होतो. या दिवसांमध्ये साधारण -१५ ते -२० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. आता उन्हाळा जवळ येऊ लागला होता. सर्व जण दोन महिन्यांनी मायदेशी, आपापल्या घरी परतणार होतो. याला अपवाद फक्त आम्हा अभियंत्यांचाच होता. संपूर्ण केंद्राच्या कार्यप्रणालीचे हस्तांतरण करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे आम्ही उन्हाळा संपल्यानंतरच मायदेशी जाणार होतो. भारती केंद्राचा परिसर आम्ही पिंजून काढल्यामुळे आता जास्त बाहेर जात नसू. शिवाय उन्हाळा आल्याने लीडरने श्रमदानाचे कामही वाढवले होते. त्यामुळे अगदीच वाटलं बाहेर जावं तर आम्ही भारती बेटावरच फिरत असू किंवा बेटावरच वेगवेगळ्या ठिकाणी समूहभोजनाचा आनंद घेत असू.
गोठलेल्या तळ्यावर मेजवानी करताना
नुकताच दिवाळीचा सण होऊन गेला होता. आम्ही दिवाळीला गोडाधोडाचे जेवण केले होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक बातमी आली की प्रोग्रेस धावपट्टीवर रशियन केंद्राचे पहिले विमान आज येत आहे. म्हणजेच आमच्यासाठी आता हिवाळा संपला होता आणि याचाच अर्थ असा की थोड्याच दिवसात भारतीयांचे पण विमान नक्की येणार होते. आमच्यापैकी लॉजिस्टिक टीमचे काही सदस्य त्या दिवशी प्रोग्रेस धावपट्टीवर काहीतरी कामानिमित्त जाणार होते. मीही त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले. रशियन सदस्यांनी धावपट्टी स्वच्छ करून विमान उतरण्यास पोषक धावपट्टी तयार केली होती. आम्ही धावपट्टीवर पोचल्यानंतर काही वेळातच नियोजित वेळेनुसार प्रोग्रेस धावपट्टीवर विमान उतरले. हंगामातले पहिले विमान यशस्वीरीत्या उतरल्यामुळे सर्व जण खूष होते. आता पुढील काही दिवसात सर्वच केंद्रांवर सदस्यांची अदलाबदल होणार होती. आमच्या सदस्यांचे काम उरकून आम्ही माघारी परतलो. आमच्यापैकी एका सदस्याला त्याच्या एका रशियन मित्राने आजच आलेल्या विमानातून आलेले ताजे दोन कांदे भेट म्हणून दिले होते. रात्रीच्या वेळी भोजन कक्षात जेवण करत असताना तो ते घेऊन आला. आम्ही तब्बल सोळा जणांनी ते दोन ताजे कांदे एकमेकांत वाटून खाल्ले. जवळपास दहा महिन्यानंतर आम्ही ताजे अन्न तोंडाला लावले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते. मागच्या उन्हाळ्यात जहाज माघारी गेल्यापासून इतके दिवस आम्ही गोठवलेले अन्नच (frozen food) खात आलो होतो. गोष्ट तशी छोटी होती पण आमच्यासाठी ती फार फार मोठी होती.
थोड्याच दिवसात आम्हा भारतीयांचेही विमान आले. त्यात खूप साऱ्या ताज्या भाज्या आणि प्राधान्य असलेल्या इतर वस्तू होत्या तसेच नवीन आलेले सहा सदस्यही होते. हे नवीन सदस्य आता पुढचे वर्षभर इथे राहणार होते आणि आमच्यापैकी काही सदस्य आता मायदेशी परतणार होते. आमच्यासाठी आज खऱ्या अर्थाने हिवाळा संपला होता. आम्ही आमच्या सदस्यांना निरोप द्यायला धावपट्टीवर गेलो. प्रत्येक जण एकमेकांची गळाभेट घेत होता. भारतात गेल्यावर भेटूया, फोन करत रहा, संपर्कात राहा अशा सूचना आम्ही एकमेकांना करत होतो. आज वर्षभर एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहिल्यानंतर आमचे दहा सदस्य मायदेशी परतत होते. मन जड झाले होते. दोघे जण तर अक्षरश: रडलेच. काय करणार? एक वर्ष हा काही छोटा काळ नसतो आणि तेही अशा वातावरणामध्ये. शेवटी अत्यंत दुःखी मनाने निरोप घेऊन ते सर्व जण निघून गेले.
आमच्यासोबत हिवाळ्यामध्ये असलेल्या सदस्यांना धावपट्टीवर निरोप देताना
डिसेंबर महिन्यात आमच्याबरोबर असलेले सर्व सदस्य आणि आमचे लीडरही मायदेशी परतले होते. आमच्या मोहिमेमधले फक्त आम्ही चार अभियंते मागे राहिलो होतो. नवीन वर्षाची नवीन मोहीम सुरु झाली होती. उन्हाळ्याची मोठ्या दुरुस्तीची कामे सुरु झाली होती. आम्ही चौघे नव्याने आलेल्या सदस्यांमध्ये हळूहळू मिसळू लागलो होतो. आम्हाला अजून दोन महिने काढायचे होते. ज्यांच्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे राहिलो ते सर्व सदस्य आपापल्या घरी परतले होते त्यामुळे आम्हालाही आमच्या घरी परतायची ओढ लागली होती पण ज्या घरात आम्ही गेले वर्षभर राहत होतो तेही आम्हाला सोडायचे नव्हते. आम्ही अशा द्विधा मनःस्थितीमध्ये भारती केंद्रामध्ये राहत होतो. कामे उरकून वेळ मिळॆल तसा आम्ही नवीन सदस्यांबरोबर आम्ही पाहिलेलं अंटार्क्टिका त्यांना दाखवायला जात असू. अशा प्रकारे आम्ही फक्त दिवस ढकलत होतो. नवीन लीडर आम्ही इथे पूर्ण वर्ष काढल्यामुळे काही गोष्टींमध्ये आमचा सल्ला घेत होते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या मेजवान्याही झाल्या होत्या. जहाज मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जरा उशिरा आले. या वर्षासाठी आलेले सर्व सामान आम्ही श्रमदान करून उतरवून घेतले. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करून राष्ट्रीय सण साजरा केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डेविस नावाच्या केंद्रामधूनही काही सदस्य आले होते.
प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण झाल्यावर सर्व सदस्यांचे सामूहिक छायाचित्र
जानेवारी महिना संपला. आम्ही आता घरी परतण्यासाठी व्याकूळ झालो होतो. आणि अखेर आम्ही परतायची तारीख जाहीर झाली, ६ फेब्रुवारी २०१७. भारती केंद्राचा निरोप घ्यायची वेळ आली होती. आदल्या रात्री शेवटचं म्हणून आम्ही चौघेही केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारून आलो. वर्षभर जमा केलेल्या आठवणी आणि त्या आठवणींशी निगडित अशा ठिकाणांना आम्ही आवर्जून भेट देऊन आलो. जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे तिथे काही ना काही प्रसंग घडलेलाच होता. असे सारे प्रसंग आठवत, त्या आठवणींमध्ये रमत आम्ही केंद्रात परतलो. त्या रात्री आमच्यापैकी कोणी झोपलंच नाही, चौघेही रात्रभर गप्पा मारत राहिलो. एवढ्या साऱ्या आठवणींमध्ये रमलो कि रात्र केव्हा संपली कळलंच नाही. सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टर आम्हाला घ्यायला आले. आमच्या चौघांबरोबर उन्हाळ्यात आलेले काही सदस्यही होते. अतिशय जड अंत:करणाने हेलिकॉप्टरच्या दिशेने निघालो. पाय उचलता उचलत नव्हते. कितीतरी वेळा मागे वळून पाहत होतो. इथे आल्यापासून खूप वेळा हेलिकॉप्टरमधून फिरलो होतो पण यावेळी तसा आनंद होत नव्हता. सर्वजण हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर लगेचच हेलिकॉप्टर वर जाऊ लागले. शेवटचं डोळेभरून भारती केंद्राची इमारत पहिली. हलकेसे डोळे पाणावले. पण तसाच शांत बसून राहिलो. पुढच्या दहाच मिनिटात प्रोग्रेस धावपट्टीवर पोचलो. तिथे आम्हाला मैत्री केंद्राकडे घेऊन जाणारं विमान लागलंच होतं. आम्हाला सोडायला आलेल्या सदस्यांच्या निरोप घेऊन आणि त्यांना हिवाळ्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गस्थ झालो. नऊ तासाच्या प्रवासात अंटार्क्टिकाची अनेक रूपं पाहून नोवो धावपट्टीवर सुखरूप पोचलो. मैत्री केंद्रात दोन दिवस मुक्काम करून केप टाऊनला जाणाऱ्या विमानात बसलो. या दिवशी आकाशात ढगाळ वातावरण होते. आम्हाला तर ते काळवंडल्यासारखेच वाटत होते. आता आम्ही अंटार्क्टिकाचा निरोप घेऊन मानवी वस्तीमध्ये तब्बल १५ महिन्यांनी प्रवेश करणार होतो. पुन्हा कधी इकडे यायला मिळेल न मिळेल अशा आविर्भावात डोळे भरून अंटार्क्टिकाच्या जमिनीला, त्या बर्फाला पाहत होतो. शेवटी वेळ कोणासाठी थांबत नसते. वैमानिकाने सीट बेल्ट बांधण्याचा आदेश दिला आणि आम्ही तब्बल पंधरा महिन्यांनंतर मानवी वस्तीकडे मार्गस्थ झालो.....