शनिवार, २१ नोव्हेंबर २०१५. केप टाऊन शहराच्या
अगदी मध्यवर्ती भागात आम्ही मुक्कामास होतो. सकाळी सहा वाजता हॉटेलमधल्या खोलीमध्ये
सामानाची आवराआवर करून झाली होती. उशीर झाल्यामुळे कसंबसं एकदाचं आवरून मी आणि माझा सहकारी मित्र सर्व
सामान घेऊनच नाष्ट्यासाठी आमच्या खोलीबाहेर पडलो. आमचा एकूण २७ सदस्यांचा समुह होता.
भरपेट नाष्टा करून आम्ही केप टाऊन विमानतळाची वाट धरली. साडेआठ वाजेपर्यंत आम्हाला
विमानतळावर पोचायचं होतं आणि आम्ही तसं पोचलोदेखील. सर्वांनी आपापलं सामान तपासुन विमानतळावरच्या
एका खास काऊंटरकडे धाव घेतली. त्या काऊंटरकडे जाताना आजुबाजूचे लोक आमच्याकडं काहिश्या
कुतूहलाने बघत होते पण माझ्या मनाचा कल दुसरीकडेच होता. अधुनमधून त्या काऊंटरवर लिहिलेल्या
नावाकडे मी सारखा पहात होतो. तब्बल दीड वर्ष
पाठपुरावा आणि प्रतिक्षा केल्यानंतर आज हा दिवस उजाडला होता. माझ्या मनात संमिश्र अशा
भावना होत्या. एका वेगळ्याच-अनोख्या दुनियेत जायची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होतेय
यासाठी मनात एक प्रकारची खळबळ माजली होती तर पहिल्यांदाच घरापासून, पुण्यापासून आणि सह्याद्री-गडकोट
यांपासुन लांब रहावं लागणार याची खंतसुद्धा होती. सोबतचे इतर सदस्यसुद्धा आपापल्या
घरी फोन करून निरोप घेत होते. हे सर्व सुरु
असतानाच इमिग्रेशन करून आम्ही आत गेलो. नंतर एका बसमध्ये बसून आम्ही विमानापर्यंत पोचलो.
त्या खास बनावटीच्या विमानाला इतर विमानांपेक्षा वेगळं उभं केलं गेलं होतं. बसमधून
उतरू लागताच सकाळपासून काळवंडलेल्या आभाळानं पाणी बरसवायला सुरुवात केली, पाऊस सुरु
झाला. सह्याद्रीतल्या पावसाला मुक्तहस्ताने
कवटाळणारा मी यापुढे १५ महिने पावसाला मुकणार होतो. म्हणूनच की काय असं वाटलं जणू काही
तो फक्त माझ्यासाठीच, मला निरोप द्यायला आला होता.
आमच्याबरोबर 'ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षण,
युनायटेड किंग्डम' या संस्थेचे काही सदस्य देखील होते. आम्ही सर्वजण विमानात चढलो. या
विमानाची खासियत म्हणजे हे विमान डांबरी रस्त्यावरही चालू शकतं आणि बर्फावर उतरूही
शकतं. ८० माणसं आणि २० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे विमान आम्हाला नव्या
जगात घेऊन जाण्यासाठी सुरु झालं आणि बघताबघता दक्षिणेकडे झेपावलंसुद्धा. या विमानाला
पुढे एक कॅमेरा लावला होता त्यामुळे आम्हाला समुद्रावरून, १०००० फुटावरून होणारा प्रवास
डोळ्यांनी पाहता येत होता. त्याचबरोबर काहीजण हा प्रवास आपापल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त
करत होते. एकंदर पाच तासाच्या प्रवासानंतर वैमानिकाने सुचना दिली की "तुम्हाला
कळवण्यास आनंद होत आहे की आपण अंटार्क्टिका वर्तुळ (Antarctica Circle) छेदुन अंटार्क्टिकामध्ये
प्रवेश केला आहे. कृपया सर्वांनी ध्रुवीय वेशभूषा (Polar Dress) परिधान करा."
गडद निळ्या रंगात दर्शविलेले - अंटार्क्टिका वर्तुळ (Antarctica Circle)
वैमानिकाने दिलेली सुचना ऐकताच मनात कुतूहल निर्माण
झालं. आता आपण एका तासात अंटार्क्टिकामध्ये पोचणार. कसं असेल? काय असेल? किती थंडी
असेल? अशा खुप साऱ्या प्रश्नांनी एकाच वेळी गर्दी केली. त्याच मनस्थितीमध्ये मी कपडे
घालायला वळलो. या सर्व गरम कपड्यांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती 'डांगरी'. डांगरी
पँट-शर्ट सारखी वेगवेगळी नसते, एक सबंधच पोषाख असतो पँट-शर्ट मिळुन झालेला आणि थंडीपासून
बचाव व्हावा म्हणून नेहमीच्या कपड्यापेक्षा कापडही जाडजूड, म्हणुन डांगरी घालणं म्हणजे
फार जिकिरिचं काम. सगळी गरम कपडे घालून झाल्यावर आम्ही अतिनील किरणांपासुन
(Ultraviolet Rays) सरंक्षण व्हावं म्हणून सन क्रीम (Sun Cream) सुद्धा लावलं. आम्ही
सीट बेल्ट लावुन समोरच्या स्क्रीनवर नजरा लावुन बसलो. अवघ्या काही मिनिटातच विमान उतरण्याची
सुचना झाली. विमानातुन उतरताना आम्हाला काळा चष्मा घालायला सांगितला. अखेर विमान 'नोवो
धावपट्टी (Novo Runway)' वर उतरलं. काळा चष्मा डोळ्यांवर चढवुन उत्साहाने मी जमिनीवर
पाय ठेवला. जमीन? जमीन नव्हतीच ती. तो होता आइस शेल्फ (Ice Shelf). आइस शेल्फ म्हणजे
अस्थायी बर्फ जो जमिनीवर-जमिनीला पापुद्र्यासारखा चिकटुन असतो. पहिलं पाऊल जेव्हा बर्फावर
ठेवलं तेव्हा चंद्रावर उतरल्यासारखं भासत होतं, कारण जिकडे पाहिल तिकडे पांढरा शुभ्र
बर्फच बर्फ दिसत होता. सुर्य प्रकाशसुद्धा लख्ख होता आणि दृश्यमानता (visibility) इतकी होती की ४० किलोमीटर
दुरवरचं पाहु शकत होतो. आपण जणू काही बर्फाच्या वाळवंटामध्येच आलोय असं काही वेळ वाटू
लागलं. आम्ही उतरलो त्यावेळी धावपट्टीवरचं तापमान होतं -७ अंश सेल्सियस. आयुष्यात पहिल्यांदाच
उणे तापमान काय असतं ते अनुभवत होतो पण उत्साह इतका होता की तितकी थंडी जाणवलीच नाही.
खुप दिवसांनी एक मोठं स्वप्न पुर्ण झालं होतं म्हणून त्याचा आनंदही तितकाच मोठा होता.
नोवो धावपट्टीवर उतरलेले विमान आणि माझे सहकारी
डांगरी परिधान केलेला मी
आम्हाला घेण्यासाठी धावपट्टीवर मैत्री केंद्रातुन
काही सदस्य आले होते. नोवो धावपट्टीपासुन मैत्री केंद्र अंदाजे ५-६ किलोमीटर आहे. त्यांच्यासोबत
आम्हाला नेण्यासाठी त्यांनी तीन 'पिस्टनबुली' (PistenBully) गाड्या आणल्या होत्या.
आम्ही मैत्री केंद्रामध्ये एक दिवस मुक्काम करून दुसऱ्याच दिवशी भारती केंद्राकडे कूच
करणार होतो. एकूण २७ जणांपैकी आम्ही ११ जण 'भारती' केंद्रामध्ये जाणार होतो त्यामुळे
आम्ही आमचं सामान धावपट्टीवरच ठेवणार होतो. सर्व सामानाची तपासणी करून आणि व्यवस्था
लावुन आम्ही पिस्टनबुलीमध्ये बसुन मैत्री केंद्राकडे निघुन गेलो. मैत्री केंद्रात पोचलो
तेव्हा तिथे तापमान होतं -१० अंश सेल्सियस. संपुर्णपणे लाकडापासुन बनवलेलं मैत्री केंद्र
हे सन १९८९ पासुन कार्यरत आहे. मैत्रीकरांनी केंद्रात पोचल्यावर आमचं मनापासुन स्वागत
केलं. मैत्री केंद्राबाहेर असलेल्या उन्हाळी लाकडापासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये (Summer Huts) आमची रहायची-झोपायची
व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारच्या एका झोपडीमध्ये ४ जण झोपू शकतात. या झोपड्यांमध्ये
थंडीपासुन संरक्षण व्हावं यासाठी कुठलंच यंत्र किंवा उपाययोजना नव्हती. अंगावर पांघरण्यासाठी
स्लिपिंग बॅग्स (Sleeping Bags) होत्या त्यामुळे -१० अंश सेल्सियस मध्येच आम्ही कशीबशी
ती रात्र काढली.
भारताचे अंटार्क्टिकामधील १९८९ पासून कार्यरत असलेले केंद्र - मैत्री
भारती केंद्राला जाण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दिवशी स्थानिक वेळेनुसार
सकाळी ६ वाजता धावपट्टीवर पोचलो. पण वैमानिकाने भारती केंद्राकडील हवामान खराब असल्यामुळे
निघण्यास नकार दिला. वैमानिकाने त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता येण्यास सांगितलं.
अंटार्क्टिकामध्ये हवामान खराब होणं ही नित्याची बाब आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं तटस्थ
भावनेने, ठीक आहे असं म्हणून मैत्री केंद्रावर माघारी आलो. रात्री झालेली अपुरी झोप
पुर्ण करून संध्याकाळी ४ वाजता पुन्हा आम्ही धावपट्टीवर पोचलो. पण तेव्हाही आमचा हिरमोड
झाला, वैमानिकाने पुन्हा तेच कारण सांगत निघण्यास नकार दिला. त्याने आम्हाला पुन्हा
दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर २०१५ ला पहाटे ३ वाजता या असं सांगितलं. या वेळी
मात्र नाराज भावनेने आम्ही मैत्री केंद्रात परतलो. त्या झोपडीमध्ये वाजणारी बोचरी थंडी,
पुर्ण झालेली झोप आणि हाताशी असणारा वेळ याचा साधकबाधक विचार करून आम्ही काही हौशी
तरुणांनी मैत्री केंद्राजवळ असणाऱ्या बर्फाच्या गुहा पाहायला जायचं ठरवलं. जवळपास एक
तासाची पायपीट करून आम्ही त्या गुहांजवळ पोचलो. जवळ गेल्यावर त्या गुहांची गंभीरता लक्षात आली. इथे उन्हाळा असल्यामुळे बर्फ हळू हळू वितळायला सुरुवात झाली होती. जर आम्ही गुहेत फार आतमध्ये गेलो आणि नशिबाने एखादा बर्फाचा तुकडा वितळल्यामुळे पडला तर माघारी यायची वाट बंद होणार होती. त्यामुळे आम्ही उसनं धाडस न करता माघारी फिरायचा निर्णय घेतला. अजुन नविन काहितरी पाहायला मिळालं म्हणुन
आनंदी मनाने मैत्री केंद्रात परतलो आणि थोडंसंच जेवण करून आपापल्या झोपडीमध्ये जाऊन
विसावलो.
निसर्गनिर्मित बर्फाच्या गुहा (Ice Caves)
नोव्हेंबर महिना असल्यामुळे पहाटे ३ वाजता काय
आणि दुपारी ३ वाजता काय उजेडच उजेड होता, कारण त्यावेळी २४ तास सुर्य होता. यावेळी
मात्र हेलपाटा होऊ नये यासाठी आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो. आम्ही सर्वजण आधीच्या दोन
वेळेसारखंच वेळेवर पोचलो होतो. आम्ही तिथे पोचल्यानंतर वैमानिकाने साधारण अर्ध्या तासाने
हिरवा कंदिल दिला. सर्व सामान-सुमान विमानात चढवलं. पण या विमानाची फक्त ३ टन वजन वाहून
नेण्याची क्षमता असल्यामुळे आम्हाला आमच्या बरोबर सगळं सामान नेता येईना. थोड्या विचारानंतर
आम्ही कमी गरजेचं सामान मागे सोडायचं अशा निष्कर्षास पोचलो. त्याप्रमाणे आम्ही कमी
गरजेचं सामान उतरवुन विमानात बसलो. वैमानिकाने विमानाचं इंजिन चालू केलं आणि थोड्याच
वेळात उड्डाण भरलं. सरतेशेवटी एकदाचं आम्ही भारती केंद्राकडे निघालो होतो.
आम्हाला मैत्री केंदातून भारती केंद्रावर घेऊन जाणारे BT-67 विमान
मैत्री केंद्र आणि भारती केंद्र यातील अंतर आहे
सुमारे २३०० किलोमीटर. आत्तापर्यंत केलेल्या प्रवासामध्ये सर्वात अवघड प्रवास तो हाच
होता. कारण अंटार्क्टिकामधून हा प्रवास करावयाचा होता. विमानसुद्धा आरामदायक नव्हतं;
त्याचा खुप जोराने येणारा आवाज, प्रशस्त नसलेली आसनं, एवढंच काय तर अगदी शौचालयसुद्धा नव्हतं. त्यात बिनभरवशाचं हवामान;
कधी वादळ येईल किंवा बर्फवृष्टी होईल याचा नेम नाही. जर का निम्म्या प्रवासात असं काही
घडलं तर वैमानिक जवळपास चांगली जागा बघुन विमान उतरवतात हे आम्ही ऐकून होतो पण खरंच
असं झालं तर?, हा विचारसुद्धा करवत नव्हता. जर असं काही झालंच तर एक दोन दिवस निघावेत
म्हणून विमानात स्लिपिंग बॅग्स सुद्धा होत्या.
साधारण चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही जपान
देशाच्या 'स्वोया' (Swoya) नावाच्या केंद्रावर विमानात इंधन भरण्यासाठी थांबलो. जपानी
मोहिमेचे सदस्य आमच्यासाठी प्यायला पाणी-ज्युस, खायला बिस्किट्स वगैरे घेऊन आले होते.
इथे तर आमचं विमान वैमानिकाने चक्क गोठलेल्या समुद्रावर उतरवलं होतं. जेव्हा आम्हाला
हे समजलं तेव्हा आम्ही आश्चर्यचकित तर झालोच पण मनात वैमानिकाबद्दल आदरयुक्त भावना
निर्माण झाली. आम्ही इथे उतरलो तेव्हा फार ढगाळ वातावरण होतं. नुकतीच इथे बर्फवृष्टी
होऊन गेली होती. विमानाचे चाकसुद्धा निम्मं बर्फामध्ये रुतलेलं होतं. याआधी एकदम सपाट धावपट्टीवरूनच विमानं उडतात
आणि उतरतात हे पाहुन आणि ऐकुन होतो पण इथे मात्र एक वेगळंच चित्र दिसत होतं. इंधन भरून
झाल्यावर आम्ही जपानी मोहिमेच्या सदस्यांचा निरोप घेऊन पुन्हा विमानात बसलो. त्या बर्फ
साठलेल्या धावपट्टीवरून उडण्यासाठी अपेक्षित गती मिळावी म्हणून वैमानिकाने नेहमीच्या
अंतरापेक्षा जास्त अंतर विमान चालवलं आणि अपेक्षित गती मिळताच विमानाने उड्डाण घेतलं.
आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. भारती केंद्र आता फक्त ४ तास प्रवासाच्या अंतरावर राहिलं
होतं.
जपानच्या स्वोया केंद्रावर
भारती केंद्राकडे कूच करताना BT-67 विमानातला एक क्षण
मैत्री केंद्रापासुनच्या प्रवासात आम्ही फक्त
पांढरा शुभ्र बर्फ पहात होतो. कित्येक आइस शेल्फ आम्ही मागे टाकले होते. स्वोया केंद्रापासुन
अंदाजे दोन तास प्रवास केल्यांनतर आम्हाला विमानामध्ये प्राणवायूची कमतरता जाणवू लागली.
तशी सुचना आम्ही सहवैमानिकास करताच त्याने आम्हास आमच्या आसनाजवळच असलेल्या नळकांड्या
देऊन प्राणवायूचा पुरवठा केला. त्यांनतर १०-१५ मिनिटांनी आम्ही प्राणवायू सिलेंडरविना नेहमीसारखा प्राणवायू घेऊ शकलो. त्यानंतर एक तासाभराने आम्हाला सततचा आइस शेल्फ
दिसणं बंद होऊन मोठमोठे बर्फाचे डोंगर दिसू लागले. मागच्या ७ तासाच्या प्रवासात सतत आम्हाला
नवीन काहीतरी पाहायला मिळत होतं. ते बर्फाचे डोंगर नसून गोठलेल्या समुद्रावर असलेले
हिमनग (Ice-Berg) आहेत हे आमच्या जरा वेळाने लक्षात आलं. तितक्यात वैमानिकाने सुचना
दिली की आपण अर्ध्या तासात भारती केंद्राजवळ असणाऱ्या प्रोग्रेस धावपट्टीवर
(Progress Runway) पोचणार आहोत. सर्वजण एकमेकांकडे पाहुन आनंदाच्या भरात स्मितहास्य
करू लागले. अर्ध्या तासात हा कंटाळवाणा प्रवास संपणार म्हणून मन आणि शरीर दोन्हीही
प्रफ्फुल्लित झाले होते.
बाहेर दिसणारे हिमनग आणि घड्याळाचे काटे पहात
पहात अर्धा तास संपला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच काही माणसे हात हलवुन आमचं स्वागत
करताना दिसली. आम्हाला घेण्यासाठी धावपट्टीवर भारती केंद्रातुन काही सदस्य आले होते.
विमान एकदाचं प्रोग्रेस धावपट्टीवर उतरलं आणि आमची उतरायची लगबग सुरु झाली. भारती केंद्रातुन
आलेल्या त्या ७-८ सदस्यांनी आमचे मनापासुन स्वागत केले. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्यापेक्षाही
जास्त आनंद दिसत होता आणि त्याचं कारणही तसंच होतं. आमच्या येण्याने त्यांच्यासाठी
घरी जाण्याचे मार्ग मोकळे झाले होते. तब्बल एक वर्ष अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी राहिल्यामुळे
त्यांना घरची ओढ खुणावत होती. आम्ही उतरताच त्या सर्वांनी अत्यंत प्रेमाने आमची गळाभेट
घेतली, शिवाय आमचं सगळं सामान उतरवायला आणि पिस्टनबुलीमध्ये चढवायलादेखील त्यांनी मदत
केली. त्यांनी एकूण तीन पिस्टनबुली गाड्या आणल्या होत्या. बोलता बोलता मला असं समजलं
होतं की दोन पिस्टनबुली गाड्या जरा लांबच्या मार्गाने जाणार आहेत आणि त्यांना भारती
केंद्रामध्ये पोचायला दोन तास लागणार आहेत, म्हणून मी त्या राहिलेल्या एका पिस्टनबुली
गाडीतुन जाणं पसंत केलं. मी आणि माझे सहकारी ज्या पिस्टनबुली गाडीत बसलो होतो ती गाडी
आडमार्गाने जाणार असल्यामुळे लवकर पोचणार होती. आम्ही आइस शेल्फवरून साधारण अर्ध्या
तासाच्या प्रवासानंतर एका ठिकाणी पोचलो त्याचं नाव होतं 'पिस्टनबुली ठिकाण'
(PistenBully Point). इथे आम्ही ती पिस्टनबुली गाडी सोडून 'स्कीडू' (Ski-Doo) गाडीत
बसलो, कारण पुढे खुप मोठा उतार होता ज्यावरून पिस्टनबुली नेणं अत्यंत धोकादायक होतं.
आता पिस्टनबुली ठिकाणापासुन भारती केंद्र केवळ १५-२० मिनिटाच्या अंतरावर होतं. एवढ्या
सगळ्या कंटाळवाण्या प्रवासात शरीर पुर्ण थकलं होतं, कधी एकदाचं पोचतोय असं झालं होतं.
आम्ही लगेचच स्कीडू गाडी सुरु करून मार्गस्थ झालो. त्या भयंकर मोठ्या उतारावर आमच्यातील
काही जणांना उतरायला सांगुन स्कीडू गाडी त्या सदस्याने कुशलतेने उतरवली. आता आम्ही
पुढचा प्रवास गोठलेल्या समुद्रावरून करणार होतो. मुंबईपासुन आम्ही खऱ्या अर्थाने प्रवासाला
सुरुवात केली होती. मुंबईपासुन सुमारे १६००० किलोमीटरचा प्रवास मागच्या दहा दिवसात
झाला होता. आता थोड्याच वेळात आम्ही भारती केंद्रावर पोचणार होतो.
पिस्टनबुली गाडी
स्किडू गाडी
अवघ्या दहाच मिनिटात आम्हाला एक चढ चढत असताना
एक पाटी दिसली - भारती : भारतीय संशोधन केंद्र (अक्षांश : ६९°२४.२७१ दक्षिण, रेखांश : ७६°१२.१४७ पुर्व). आता मात्र शरीरातला सगळा थकवा
नाहिसा होऊन अंगात नुसता जोम चढला होता. दोन मिनिटात आम्ही ती टेकडी चढुन वर आलो आणि
आम्हाला भारती केंद्राची इमारत नजरेस पडली.
भारती केंद्र आणि आजूबाजूचा परिसर
भारती केंद्रामधील सर्व सदस्य आमच्या स्वागतासाठी मुख्य दरवाज्याजवळ उभे असल्याचं आम्ही पहिलं. डोळे आपोआपच भारती केंद्राच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळत होते. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. घरून निघुन तब्बल दहा दिवसांनी ऐच्छिक ठिकाणी सुखरूप पोचलो होतो. मन अगदी समाधान पावलं होतं.
मुंबई पासून ते भारती केंद्र असा प्रवासाचा Route Map
आता पुढचे १५ महिने हेच
माझं घर, माझ्या कामाचं ठिकाण असणार होतं. आता मला अंटार्क्टिकामधील थंडी अनुभवायची होती, बर्फवृष्टी (Snow Fall) कशी असते ते पाहायचं होतं, इथे तयार होणारी वादळे झेलायची होती, पेंग्विन्स कसे दिसतात हे स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं, चोवीस तासाच्या असणाऱ्या दिवस-रात्री अनुभवायच्या होत्या, कुमेरु ज्योती (Aurora Australis) पाहून पृथ्वीवरच्या एका अप्रतिम सौंदर्याला आठवणींमध्ये साठवणार होतो. याच साऱ्या विचारात मी पायऱ्या चढून मुख्य दरवाज्यात पोचलो आणि सगळ्यांचं स्वागत स्वीकारू लागलो. मला नेमून दिलेल्या खोलीमध्ये सामान ठेऊन भूक नसतानासुद्धा पोटभर जेवण केले. माझा भारती केंद्रात पोचायचा प्रवास उत्तम झाला होता. या प्रवासात अनुभवलेल्या अविस्मरणीय आठवणींचा ठेवा मनाशी घट्ट करून गाढ झोपी गेलो.
Fab👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअतिशय छान शब्दांकन, तुझ्यासोबत त् याच प्रवासात मी होतो, त्याचा अनुभव, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम सर
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम साहेब
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमहेश , तू कधीच विसरू शकणार नाहीस असा हा तुझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास !
ReplyDeleteनक्कीच नाही विसरू शकत सर. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद सर.
Deleteअप्रतिम प्रवासवर्णन
ReplyDeleteधन्यवाद
DeleteGreat waiting for next part
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम प्रवासवर्णन👍
ReplyDelete