उन्हाळा म्हटलं की नजरेसमोर येतात अंगावर लागलेल्या घामाच्या धारा, भट्टीसारखे तापलेले रस्ते आणि जीवघेणा उकाडा. आपल्याकडे उन्हाळ्यात मे महिन्यात तर सुर्य जणू काही आगच ओकत असतो. या दिवसांत रणरणत्या उन्हात काम करणारे शेतकरी व कामगारसुद्धा झाडांचा आसरा घेऊ लागतात. शहरी भागात तर आज-काल एसी किंवा फॅन याशिवाय उन्हाळा निघूच शकत नाही. आजकाल तर ५० अंश सेल्सिअस (सर्वोच्च) तापमान हि तर उन्हाळ्यातली नित्याची बाब झाली आहे. असा हा उन्हाळा, जवळपास सर्वांनाच नकोनकोसा असलेला. पण याला अपवाद म्हणजे अंटार्क्टिका. इथला उन्हाळा आपणा सर्वांना हवाहवासा वाटेल असाच असतो. अंटार्क्टिका खंड म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात थंड ठिकाण असलेला प्रदेश. अंटार्क्टिकामध्ये दोनच मुख्य ऋतू आहेत. एक हिवाळा आणि दुसरा म्हणजे उन्हाळा. इथे आपल्यासारखा पावसाळा वगैरे काही नसतं. वर्षभरात इथे केव्हाही पाऊस म्हणजेच बर्फ पडतो. सतत उणे तापमान असल्यामुळे इथे कायम बर्फवृष्टीच होते.
अंटार्क्टिकामधला उन्हाळासुद्धा सुर्याच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. अंटार्क्टिका हे पृथ्वीच्या दक्षिण टोकाला असल्यामुळे, सुर्य या उन्हाळ्याच्या दिवसात २४ तास दिसतो म्हणजेच या काळात इकडे रात्र होतच नाही. पृथ्वी तिच्या अक्षापासुन २३.५ अंश झुकलेली असल्यामुळं इकडे आपल्याला अशी किमया पाहावयास मिळते. अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्यात दक्षिण ध्रुवावर सहा महिने म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च एकसारखा उजेड असतो आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी एकसारखा उजेड असतो. अंटार्क्टिका म्हणजे एक मोठं - महाकाय बेटच आहे, चारही बाजुंनी पाण्यानी वेढलेलं. तापमान सतत उणे असल्यामुळे हिवाळ्यात समुद्राचं पाणी किनाऱ्यापासुन एक ते दीड हजार किलोमीटर पर्यंत गोठतं आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं. यामुळे अंटार्क्टिकाचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट होऊन जाते. पुन्हा मग जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ वितळून पुन्हा त्याचे पाण्यात रुपांतर होते.
आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरून तापमानाबाबत बोलायचं झालं तर इथलं वर्षभराचं सरासरी तापमान हे उणे तापमान आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात इथे सरासरी -१० अंश सेल्सिअस तापमान असते तर दक्षिण ध्रुव आणि आतील पठारी-पर्वतीय भागात सरासरी तापमान -६० अंश सेल्सिअस असते. उन्हाळ्यात मात्र समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात हेच तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर जाते तर आतल्या भागात -३० अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोचते.
उन्हाळा हाच इथला काम करण्यासाठी उत्तम ऋतू आहे. जरी उणे तापमान असलं तरी हिवाळ्याच्या तुलनेने इथला उन्हाळा हा गरम मानला जातो. इथे उन्हाळ्यात नवीन संशोधन केंद्रांची उभारणी किंवा असलेल्या केंद्राची डागडुजी ही मुख्य कामे सर्वच देशांमार्फत केली जातात. उन्हाळ्यात संशोधनासाठी वेगवेगळ्या देशांचे शास्त्रज्ञ येऊ लागतात. दळणवळणासाठी हेच दिवस उत्तम असल्यामुळे विमानं उतरवण्यासाठी आईस शेल्फवर धावपट्ट्या तयार केल्या जातात आणि म्हणूनच जगातील सर्वांत धोकादायक धावपट्ट्या ह्या अंटार्क्टिकामध्येच आहेत. तसेच काही समुद्र किनाऱ्याजवळच्या केंद्रांवर मुख्य दळणवळण हे जहाजांद्वारे चालते. उन्हाळ्यात समुद्रावरचा बर्फ वितळून गेल्यामुळे जहाजे येणं सोपे होऊन जाते. त्यामुळे हिवाळ्यासाठी लागणारी संपुर्ण रसद ही जहाजांद्वारेच येते आणि मोहिमेतील बाकी सदस्यांची ये-जा विमानांमार्फत होते.
भारताची अंटार्क्टिकामध्ये कार्यरत असलेली दोन संशोधन केंद्रे आहेत - 'मैत्री' आणि 'भारती'. त्यातील भारती केंद्र हे समुद्रकिनारी आहे. इथेसुद्धा उन्हाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात असतो. या दिवसात नवीन सदस्य आणि जुन्या सदस्यांची अदलाबदल होते. मी भारती केंद्रामध्ये नोव्हेंबर २०१५ महिन्याच्या अखेरीसच पोचलो होतो. याच काळात चौतिसाव्या मोहिमेच्या सदस्यांची आपापल्या घरी जाण्याची घाई-गडबड होती. आम्ही नवीन सदस्य ज्या विमानाने आलो त्या विमानाने मागचे एक वर्ष अंटार्क्टिकामध्ये राहिलेले जुने सदस्य मायदेशी परत गेले. आम्हा नव्यानेच आलेल्या सदस्यांमध्ये बरेच जण शास्त्रज्ञ होते. अंटार्क्टिकामध्ये विज्ञानाच्या मुख्य शाखांपैकी पुढे दिलेल्या शाखांमध्ये भारतीय शास्त्रज्ञ काम करतात - हवामानशास्त्र, भूशास्त्र, भू-भौतिकीशास्त्र, भू-चुंबकीयशास्त्र, वायुमंडलीय भौतिकीशास्त्र, आण्विकशास्त्र, हिमनदशास्त्र, समुद्रशास्त्र, सुक्ष्म-वनस्पतीशास्त्र, सुक्ष्म जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मानव शरीरशास्त्र आणि योगशास्त्र.
आम्ही इथे आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सगळ्या शास्त्रज्ञांनी आपापलं वैज्ञानिक काम करायला सुरुवात केली. पण आम्ही पोचल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बर्फवृष्टी सुरु झाली आणि ती जवळपास आठवडाभर सुरूच होती. त्यातल्या एका दिवशी तर वादळ पण सुरु झाले होते. त्या दिवशी पहिल्यांदा मी प्रतिताशी ७० किलोमीटर या वेगाचे वारे अनुभवले. आठवडाभरानंतर मात्र आम्हाला सुर्याचं दर्शन झाले. त्यानंतर काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक काम हे केंद्राबाहेर असल्यामुळे स्किडू गाडीने ते त्यांच्या अपेक्षित ठिकाणी जाऊ लागले. मीसुद्धा माझ्या कामाला लागलोच होतो. पुढील पुर्ण वर्ष इथे रहायचं असल्यामुळे आणि केंद्राच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आम्हा चार अभियंत्यांवर असल्यामुळे केंद्रातील सर्व यंत्रणा समजावुन घेण्याच्या कामास आम्ही लागलो होतो. नंतर जसा जसा वेळ मिळेल तसं आम्ही अंटार्क्टिकाचा आनंद घेण्यासाठी फिरावयास जाऊ लागलो. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तापमान साधारणपणे शुन्य अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते त्यामुळे भारती केंद्राच्या आसपास असणारे सर्व गोठलेले तलाव वितळू लागले होते. जिथे छोटे-मोठे खड्डे आहेत तिथे साचलेला बर्फ वितळून त्याचे पाणी होऊ लागले होते. कुतूहलापोटी मी एकदा ते पाणी पिऊन पाहिले. अतिशय गोड, चविष्ठ पण तितकंच थंड पाणी होते ते.
उन्हाळ्यात भारती केंद्राजवळच्या परिसरात तापमान सरासरी -१० ते ५ अंश सेल्सिअस असते त्यामुळे मध्यम थराचे कपडे घालुन बाहेर फिरू शकत होतो, डांगरी घालणे काही जरुरीचे नव्हते. पृथ्वीवर असणाऱ्या ओझोन वायूच्या थराला जे छिद्र पडले आहे ते अंटार्क्टिकाच्या वरच आहे, त्यामुळे सुर्यापासून येणारी अतिनील किरणे मानवी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात आणि म्हणून अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी आम्ही चेहऱ्यावर आणि इतर उघड्या शरीरावर सन क्रीम लावून बाहेर जात असू. पांढऱ्या शुभ्र बर्फामुळे आणि सुर्यप्रकाशाबरोबर येणाऱ्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांना काही हानी होऊ नये यासाठी काळा चष्मा सतत डोळ्यावर असे. केंद्रापासून जर कधी लांब कामासाठी जायचे असल्यास संवाद साधण्यासाठी सदस्य वॉकी-टॉकी घेऊन बाहेर पडत असत.
डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व तलाव पूर्णपणे वितळलेले होते. याही महिन्यात एक वादळ येऊन गेले होते. तेव्हा वाऱ्याचा कमाल वेग प्रतिताशी ९४ किलोमीटर इतका होता. दरवर्षीप्रमाणेच पृथ्वी २२ डिसेंबर २०१५ रोजी दक्षिणेकडे सर्वात जास्त कललेली होती. त्या दिवशी दिसणाऱ्या सुर्यप्रकाशाचे प्रमाण हे इतर दिवसांपेक्षा सर्वात जास्त होते. आम्ही भारती केंद्रावर पोचल्यापासून २४ तासांचा दिवस अनुभवत होतो म्हणजेच आम्ही पोचल्यापासुन सुर्य कधी मावळलाच नव्हता, भारती केंद्राभोवती तो फक्त गोलाकार फिरत होता. त्यातही आपल्याकडे संध्याकाळी ४ वाजल्यानंतर जसा सुर्यप्रकाश पडतो तसा सुर्यप्रकाश दिवसातुन बारा-चौदा तास पडत होता. आम्हा नव्याने गेलेल्या सगळ्यांसाठी हे सगळं अद्भुत, अद्वितीय होतं. डिसेंबर महिन्यात आम्ही निसर्गाची मजा तर घेतलीच पण केंद्रामध्येही आम्ही दोन-तीन सदस्यांचे वाढदिवस तसेच ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात साजरे केले.
२०१६ या नवीन वर्षाचा पहिला महिना आणि त्याचा दुसराच दिवस आमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. आम्हाला वर्षभरासाठी लागणारी संपुर्ण रसद घेऊन येणारं जहाज भारती केंद्रापासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटरवर येऊन पोचले होते. जहाज केप टाऊनपासून निघून या ठिकाणी पोचायला नऊ दिवस लागले होते. अतिशय आनंदाची बातमी होती ही. विनाजहाज इथे संपुर्ण वर्षभराचे सामान भरणं म्हणजे महाखर्चिक आणि जवळपास अशक्य काम कारण भारती केंद्राला येणारं विमान एका वेळी फक्त हजार ते बाराशे किलो वजनाचे सामान आणू शकते. जहाज आल्याची बातमी कळताच आम्ही सर्वांनी संवाद कक्षामध्ये असलेल्या रेडिओकडे धाव घेतली आणि रेडिओवरून जहाजावर असलेल्या सदस्यांचे स्वागत केले. थोड्या वेळाने जहाजावर असलेल्या हेलिकॉप्टरमधून आम्हाला भेटावयास जहाजाचे लीडर आणि कमांडर आले. त्यांचे स्वागत आम्ही आनंदाने केले.
जहाज केंद्राजवळ आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून हेलिकॉप्टरने सामान येणे सुरु झाले. त्यात प्रामुख्याने पालेभाज्या, चिकन, अंडी, ज्युस, दुध आणि इतर खाण्याच्या पदार्थांचा समावेश होता. दिवसातून दोन-तीन वेळा हेलिकॉप्टर असे सामान आणून केंद्राच्या मुख्य दरवाज्यासमोर आणून उतरवत असे आणि मग सर्व सदस्य पाळीपाळीने ते सामान आतमध्ये घेऊन फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. खाण्याचं काही सामान जसे कि मॅगी, बिस्कीट, चॉकलेट, पीठ, तांदूळ हे बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. खाण्याव्यतिरिक्त असलेले सामानसुद्धा बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. मग जसे लागेल तसे आठवडाभरात आम्ही यातला सामान केंद्रामध्ये असलेल्या फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. प्रत्येक जण स्वतःचं असलेलं काम सांभाळून सामान उतरवणे आणि चढवणे यात प्रामाणिकपणे भाग घेत होता. काही जुन्या सदस्यांनी या कामाला 'श्रमदान' असं खोचक पण अर्थपूर्ण नाव दिले होते. या कामाबरोबरच जहाजाबरोबर आलेल्या शास्त्रज्ञांची कामेसुद्धा सुरु झाली होती.
जहाज केंद्रापासून जरी फक्त अठ्ठावीस किलोमीटर असले तरी ते काही एक-दोन दिवसात केंद्राजवळ पोचणार नव्हते कारण समुद्रावर असणारा बर्फाचा थर अजून वितळलेला नव्हता. समुद्रकिनारी पाणी जरा जरा जमायला सुरुवात झाली होती. तो पातळ थर तोडून जागोजागी समुद्री प्राणी - 'सील' उन्हाळ्याचा आस्वाद घेत पहुडलेले दिसत होते. या दिवसात समुद्रावर स्किडू किंवा पिस्टनबुली गाडी घेऊन उतरणं अत्यंत धोकादायक होते. अशातच डिसेंबर महिन्याच्या मध्यात असाच एक छोटासा अपघात झाला. काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक काम असल्यामुळे ते समुद्रावरून स्किडू गाडीने जात होते. पण एके ठिकाणी बर्फाचा वरचा थर वितळल्यामुळे गाडीचा पुढचा भाग रुतून बसला. समुद्राच्या ऐन मध्यावर चिखलात रुतल्यासारखी स्किडू गाडी रुतल्याने सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी पटकन जवळ असलेल्या वॉकी-टॉकी वापरून केंद्राला झाल्या प्रकारची माहिती कळवली. लगेचच केंद्रामधून एक पिस्टनबुली घेऊन ४ सदस्य त्यांच्या मदतीस रवाना झाले. सर्व शास्त्रज्ञ आणि टीम सुखरूप स्किडू वरून उतरले होते. पिस्टनबुली अपघातस्थळी पोहोचली आणि स्किडू गाडी दोऱ्या बांधून पिस्टनबुलीने ओढून वर काढली. सर्व जण दोन्ही गाड्यांसह सुखरूप केंद्रामध्ये परतले. आणि तेव्हापासून समुद्रावर गाड्या चालवणे बंद केले गेले.
याच दरम्यान जहाज बर्फ तोडत तोडत हळूहळू पुढे सरकत होते. प्रतिदिवशी जहाज फक्त एक-दोन किलोमीटर प्रवास करत होते. अखेर तब्बल पंधरा दिवसांनी म्हणजे १८ जानेवारीला फक्त अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करून जहाज भारती केंद्राजवळच्या किनाऱ्याला लागले होते. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनपासून भारती केंद्रांपासून अठ्ठावीस किलोमीटर दूर हे अंतर म्हणजेच सुमारे साडेपाच हजार किलोमीटर अंतर जहाजाने फक्त नऊ दिवसात कापले पण बर्फाच्छदित असलेल्या समुद्राचे अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापायला जहाजाला पंधरा दिवस लागले. म्हणजे विचार करा जर ऐन हिवाळ्यात जुलै महिन्यात जहाज यायचं झालं तर हजार-दीड हजार किलोमीटरवरचा बर्फ तोडायला जहाजाला किती दिवस लागतील?
जहाज ज्या दिवशी किनाऱ्याला लागले त्यादिवशी भारती केंद्रामध्ये जहाजामधून आलेल्या सर्व सदस्यांना मेजवानी देण्यात आली, मोठ्या उत्साहात त्यांचे सर्वांनी स्वागत केले. जहाज अठ्ठावीस किलोमीटर दूर असल्यापासून हेलिकॉप्टरने आलेल्या सामानाच्या निम्म्यापेक्षा जास्त सामान उतरवुन झाले होते. ज्या कामासाठी जहाज किनाऱ्याला लागणे अतिशय गरजेचं होते ते मोहिमेतील सर्वांत म्हणजे सर्वांत महत्वाचे काम जहाज आल्याच्या दुसऱ्याच दिवशीच सुरु झाले. जहाजावरील अधिकारी व खलाशी मिळून सर्वांनी शंभर मीटर पाईपलाईन टाकली आणि किनाऱ्याजवळच असणाऱ्या मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये इंधन भरायाचे काम सुरु झाले. जरी जहाज समुद्रकिनाऱ्याला लागलेले असले तरी आजूबाजूच्या बर्फावर माणसे चालू शकत होती आणि त्याच बर्फावरून ही पाईपलाईन टाकली होती. समुद्रावर गाड्या नेणं मात्र याआधीच बंद केलं होतं. हे इंधन भरायचे काम जवळजवळ दीड दिवस एकसारखे चालू होते. हेच इंधन वापरून जनरेटर वर्षभर कार्यरत ठेवायचं काम आम्हा अभियंत्यांच्या टीमकडे होते. जनरेटरपासून निघणाऱ्या गरम वाफेपासून संपूर्ण केंद्र गरम (साधारण वीस डिग्री सेल्सिअस) पर्यंत ठेवता येत असे. त्यामुळे सर्वांत महत्वाचं सामान उतरवून पूर्ण वर्षभराची काळजी मिटवली होती.
जहाज केंद्राजवळ लागल्यानंतर तीन दिवसांनी जहाजातील सदस्यांनी केंद्रातील सदस्यांना मेजवानीसाठी आमंत्रित केले. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जहाजामध्ये जाणार होतो. अखेर आम्ही सात-आठ जण रात्री आठ वाजताच्या सुमारास पण तिन्हीसांजेला असतो तशा सूर्यप्रकाशात जहाजाकडे चालत निघालो. समुद्रावरून चालत आम्ही जहाजावरुन सोडलेल्या मोठ्या लोखंडी शिडीवर चढून जहाजात प्रवेश केला. आत गेल्यावर सर्वांनी आमचे हस्तांदोलन करून स्वागत केले. मेजवानीला सुरुवात झाली. जहाजावर असताना चारही बाजूने बर्फ, बाहेर रात्री उणे असणारं तापमान पाहून हे सगळं एखाद्या सिनेमासारखं भासत होतं.
जहाज किनाऱ्याजवळ आल्याच्या आठवडाभरातच समुद्रावरचा संपुर्ण बर्फ वितळून गेला. एक महिन्यापुर्वी ज्या बर्फावर गाड्या चालत होत्या त्याचे पुर्णपणे पाण्यात रूपांतर झालेले होते. फक्त उन्हाळ्यासाठी संशोधनास आलेले शास्त्रज्ञ जानेवारी अखेरपर्यंत मायदेशी परतले होते. आम्हाला केंद्रातील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचे हस्तांतरण देण्यासाठी मागे राहिलेले मागच्या मोहिमेचे चार अभियंते मात्र मायदेशी जायचे अजून बाकी होते. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघून गेले. आता संपुर्ण वर्षभरासाठी मी आणि माझ्याबरोबर असणारे अभियंते भारती केंद्र तांत्रिकदृष्ट्या सांभाळणार होतो.
जानेवारी संपेपर्यंत जहाजामधून या वर्षी लागणारे सर्व सामान उतरवून झाले होते. जहाजावरील शास्त्रज्ञांची थोडीफार कामे अजून बाकी होती म्हणूनच जहाज अजून मुक्कामास होते पण जहाजाचे लीडर आणि कमांडर यांनी जहाज माघारी निघण्याची तारीख ठरवुन निघण्याची तयारी सुरू केली होती. सर्व कामं आटोपल्यानंतर जहाज निघायच्या आदल्या दिवशी पुन्हा जहाजावरील सदस्यांना केंद्रातील सदस्यांतर्फे मेजवानी देण्यात आली. त्या दिवशी जहाजावरील सर्व सदस्यांनी केंद्रातच मुक्काम केला. आणि अखेर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी जहाज मैत्री केंद्राकडे मार्गस्थ झाले. जहाज ५० किलोमीटर अंतरावर दूर गेले असताना जहाजावरील सदस्यांनी रेडिओद्वारे पुनःश्च आमचा निरोप घेतला.
जहाज परतत असताना सर्वांमध्ये दुःखी भावना होत्या. आता आम्हाला पुढच्या वर्षी जहाज येईपर्यंत आहे त्या साधनसामुग्रीमध्ये राहायचे होते. संपुर्ण जगाशी आता आमचा संबंध पुढच्या नऊ महिन्यांसाठी तुटला होता कारण विमान नोव्हेंबर २०१६ आणि जहाज जानेवारी २०१७ मध्येच येऊ शकेन याबद्दल शंका नव्हती. जहाजाच्या जाण्याने अलिखित स्वरूपात उन्हाळा संपला होता.
भारती केंद्रावर आता आम्ही फक्त तेवीस जण राहणार होतो. या पुढच्या नऊ महिन्यात आम्हाला जगाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट हेच काय ते माध्यम होते. या काळात आम्ही भारती केंद्र सोडून कुठेही जाऊ शकणार नव्हतो, ना कोणी आम्हाला घ्यायलाही येणार नव्हते. आता आम्हाला अंटार्क्टिकामधील हिवाळा अनुभवायला मिळणार होता. उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाणाऱ्या तापमानाची तीव्रता आम्ही जाणून घेणार होतो. आठवडा-आठवडा चालणारी बर्फवृष्टी, वादळे यांचा आनंद घेणार होतो. इथे दिसणारा अरोरा म्हणजे तर आमच्यासाठी आकर्षणाचे केंद्रच होता. तसेच चोवीस तासांच्या रात्री म्हणजेच ध्रुवीय रात्री अनुभवायला मिळणार होत्या. ह्या सगळ्यात थोडी खुशी आणि थोडा गम या मनस्थितीमध्ये फेब्रुवारी महिना संपला होता. Game of Thrones या टीव्ही मालिकेत असणारे एक प्रसिद्ध वाक्य सतत मनात घोंगावत होते, ते म्हणजेच Winter is coming....
अंटार्क्टिकाचा भौगोलिक नकाशा

भारताची अंटार्क्टिकामध्ये कार्यरत असलेली दोन संशोधन केंद्रे

ओझोन थराला पडलेले सर्वाधिक मोठे छिद्र - सप्टेंबर २००६
डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व तलाव पूर्णपणे वितळलेले होते. याही महिन्यात एक वादळ येऊन गेले होते. तेव्हा वाऱ्याचा कमाल वेग प्रतिताशी ९४ किलोमीटर इतका होता. दरवर्षीप्रमाणेच पृथ्वी २२ डिसेंबर २०१५ रोजी दक्षिणेकडे सर्वात जास्त कललेली होती. त्या दिवशी दिसणाऱ्या सुर्यप्रकाशाचे प्रमाण हे इतर दिवसांपेक्षा सर्वात जास्त होते. आम्ही भारती केंद्रावर पोचल्यापासून २४ तासांचा दिवस अनुभवत होतो म्हणजेच आम्ही पोचल्यापासुन सुर्य कधी मावळलाच नव्हता, भारती केंद्राभोवती तो फक्त गोलाकार फिरत होता. त्यातही आपल्याकडे संध्याकाळी ४ वाजल्यानंतर जसा सुर्यप्रकाश पडतो तसा सुर्यप्रकाश दिवसातुन बारा-चौदा तास पडत होता. आम्हा नव्याने गेलेल्या सगळ्यांसाठी हे सगळं अद्भुत, अद्वितीय होतं. डिसेंबर महिन्यात आम्ही निसर्गाची मजा तर घेतलीच पण केंद्रामध्येही आम्ही दोन-तीन सदस्यांचे वाढदिवस तसेच ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात साजरे केले.
उन्हाळ्यात टिपलेले भारती केंद्राचे हवाई दृश्य
२०१६ या नवीन वर्षाचा पहिला महिना आणि त्याचा दुसराच दिवस आमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. आम्हाला वर्षभरासाठी लागणारी संपुर्ण रसद घेऊन येणारं जहाज भारती केंद्रापासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटरवर येऊन पोचले होते. जहाज केप टाऊनपासून निघून या ठिकाणी पोचायला नऊ दिवस लागले होते. अतिशय आनंदाची बातमी होती ही. विनाजहाज इथे संपुर्ण वर्षभराचे सामान भरणं म्हणजे महाखर्चिक आणि जवळपास अशक्य काम कारण भारती केंद्राला येणारं विमान एका वेळी फक्त हजार ते बाराशे किलो वजनाचे सामान आणू शकते. जहाज आल्याची बातमी कळताच आम्ही सर्वांनी संवाद कक्षामध्ये असलेल्या रेडिओकडे धाव घेतली आणि रेडिओवरून जहाजावर असलेल्या सदस्यांचे स्वागत केले. थोड्या वेळाने जहाजावर असलेल्या हेलिकॉप्टरमधून आम्हाला भेटावयास जहाजाचे लीडर आणि कमांडर आले. त्यांचे स्वागत आम्ही आनंदाने केले.
समुद्रावरील बर्फाचा थर तोडून पुढे सरकताना जहाज
जहाज केंद्राजवळ आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून हेलिकॉप्टरने सामान येणे सुरु झाले. त्यात प्रामुख्याने पालेभाज्या, चिकन, अंडी, ज्युस, दुध आणि इतर खाण्याच्या पदार्थांचा समावेश होता. दिवसातून दोन-तीन वेळा हेलिकॉप्टर असे सामान आणून केंद्राच्या मुख्य दरवाज्यासमोर आणून उतरवत असे आणि मग सर्व सदस्य पाळीपाळीने ते सामान आतमध्ये घेऊन फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. खाण्याचं काही सामान जसे कि मॅगी, बिस्कीट, चॉकलेट, पीठ, तांदूळ हे बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. खाण्याव्यतिरिक्त असलेले सामानसुद्धा बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. मग जसे लागेल तसे आठवडाभरात आम्ही यातला सामान केंद्रामध्ये असलेल्या फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. प्रत्येक जण स्वतःचं असलेलं काम सांभाळून सामान उतरवणे आणि चढवणे यात प्रामाणिकपणे भाग घेत होता. काही जुन्या सदस्यांनी या कामाला 'श्रमदान' असं खोचक पण अर्थपूर्ण नाव दिले होते. या कामाबरोबरच जहाजाबरोबर आलेल्या शास्त्रज्ञांची कामेसुद्धा सुरु झाली होती.
सामान उतरवताना हेलिकॉप्टर
जहाज केंद्रापासून जरी फक्त अठ्ठावीस किलोमीटर असले तरी ते काही एक-दोन दिवसात केंद्राजवळ पोचणार नव्हते कारण समुद्रावर असणारा बर्फाचा थर अजून वितळलेला नव्हता. समुद्रकिनारी पाणी जरा जरा जमायला सुरुवात झाली होती. तो पातळ थर तोडून जागोजागी समुद्री प्राणी - 'सील' उन्हाळ्याचा आस्वाद घेत पहुडलेले दिसत होते. या दिवसात समुद्रावर स्किडू किंवा पिस्टनबुली गाडी घेऊन उतरणं अत्यंत धोकादायक होते. अशातच डिसेंबर महिन्याच्या मध्यात असाच एक छोटासा अपघात झाला. काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक काम असल्यामुळे ते समुद्रावरून स्किडू गाडीने जात होते. पण एके ठिकाणी बर्फाचा वरचा थर वितळल्यामुळे गाडीचा पुढचा भाग रुतून बसला. समुद्राच्या ऐन मध्यावर चिखलात रुतल्यासारखी स्किडू गाडी रुतल्याने सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी पटकन जवळ असलेल्या वॉकी-टॉकी वापरून केंद्राला झाल्या प्रकारची माहिती कळवली. लगेचच केंद्रामधून एक पिस्टनबुली घेऊन ४ सदस्य त्यांच्या मदतीस रवाना झाले. सर्व शास्त्रज्ञ आणि टीम सुखरूप स्किडू वरून उतरले होते. पिस्टनबुली अपघातस्थळी पोहोचली आणि स्किडू गाडी दोऱ्या बांधून पिस्टनबुलीने ओढून वर काढली. सर्व जण दोन्ही गाड्यांसह सुखरूप केंद्रामध्ये परतले. आणि तेव्हापासून समुद्रावर गाड्या चालवणे बंद केले गेले.
याच दरम्यान जहाज बर्फ तोडत तोडत हळूहळू पुढे सरकत होते. प्रतिदिवशी जहाज फक्त एक-दोन किलोमीटर प्रवास करत होते. अखेर तब्बल पंधरा दिवसांनी म्हणजे १८ जानेवारीला फक्त अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करून जहाज भारती केंद्राजवळच्या किनाऱ्याला लागले होते. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनपासून भारती केंद्रांपासून अठ्ठावीस किलोमीटर दूर हे अंतर म्हणजेच सुमारे साडेपाच हजार किलोमीटर अंतर जहाजाने फक्त नऊ दिवसात कापले पण बर्फाच्छदित असलेल्या समुद्राचे अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापायला जहाजाला पंधरा दिवस लागले. म्हणजे विचार करा जर ऐन हिवाळ्यात जुलै महिन्यात जहाज यायचं झालं तर हजार-दीड हजार किलोमीटरवरचा बर्फ तोडायला जहाजाला किती दिवस लागतील?
जहाज ज्या दिवशी किनाऱ्याला लागले त्यादिवशी भारती केंद्रामध्ये जहाजामधून आलेल्या सर्व सदस्यांना मेजवानी देण्यात आली, मोठ्या उत्साहात त्यांचे सर्वांनी स्वागत केले. जहाज अठ्ठावीस किलोमीटर दूर असल्यापासून हेलिकॉप्टरने आलेल्या सामानाच्या निम्म्यापेक्षा जास्त सामान उतरवुन झाले होते. ज्या कामासाठी जहाज किनाऱ्याला लागणे अतिशय गरजेचं होते ते मोहिमेतील सर्वांत म्हणजे सर्वांत महत्वाचे काम जहाज आल्याच्या दुसऱ्याच दिवशीच सुरु झाले. जहाजावरील अधिकारी व खलाशी मिळून सर्वांनी शंभर मीटर पाईपलाईन टाकली आणि किनाऱ्याजवळच असणाऱ्या मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये इंधन भरायाचे काम सुरु झाले. जरी जहाज समुद्रकिनाऱ्याला लागलेले असले तरी आजूबाजूच्या बर्फावर माणसे चालू शकत होती आणि त्याच बर्फावरून ही पाईपलाईन टाकली होती. समुद्रावर गाड्या नेणं मात्र याआधीच बंद केलं होतं. हे इंधन भरायचे काम जवळजवळ दीड दिवस एकसारखे चालू होते. हेच इंधन वापरून जनरेटर वर्षभर कार्यरत ठेवायचं काम आम्हा अभियंत्यांच्या टीमकडे होते. जनरेटरपासून निघणाऱ्या गरम वाफेपासून संपूर्ण केंद्र गरम (साधारण वीस डिग्री सेल्सिअस) पर्यंत ठेवता येत असे. त्यामुळे सर्वांत महत्वाचं सामान उतरवून पूर्ण वर्षभराची काळजी मिटवली होती.
भारती केंद्राजवळच्या किनाऱ्यालगत (बर्फावर) स्थिरावलेले जहाज
जहाज केंद्राजवळ लागल्यानंतर तीन दिवसांनी जहाजातील सदस्यांनी केंद्रातील सदस्यांना मेजवानीसाठी आमंत्रित केले. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जहाजामध्ये जाणार होतो. अखेर आम्ही सात-आठ जण रात्री आठ वाजताच्या सुमारास पण तिन्हीसांजेला असतो तशा सूर्यप्रकाशात जहाजाकडे चालत निघालो. समुद्रावरून चालत आम्ही जहाजावरुन सोडलेल्या मोठ्या लोखंडी शिडीवर चढून जहाजात प्रवेश केला. आत गेल्यावर सर्वांनी आमचे हस्तांदोलन करून स्वागत केले. मेजवानीला सुरुवात झाली. जहाजावर असताना चारही बाजूने बर्फ, बाहेर रात्री उणे असणारं तापमान पाहून हे सगळं एखाद्या सिनेमासारखं भासत होतं.
जहाज किनाऱ्याजवळ आल्याच्या आठवडाभरातच समुद्रावरचा संपुर्ण बर्फ वितळून गेला. एक महिन्यापुर्वी ज्या बर्फावर गाड्या चालत होत्या त्याचे पुर्णपणे पाण्यात रूपांतर झालेले होते. फक्त उन्हाळ्यासाठी संशोधनास आलेले शास्त्रज्ञ जानेवारी अखेरपर्यंत मायदेशी परतले होते. आम्हाला केंद्रातील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचे हस्तांतरण देण्यासाठी मागे राहिलेले मागच्या मोहिमेचे चार अभियंते मात्र मायदेशी जायचे अजून बाकी होते. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघून गेले. आता संपुर्ण वर्षभरासाठी मी आणि माझ्याबरोबर असणारे अभियंते भारती केंद्र तांत्रिकदृष्ट्या सांभाळणार होतो.
समुद्रावरचा बर्फ पुर्णपणे वितळून पाणी झाल्याचे दृश्य
जानेवारी संपेपर्यंत जहाजामधून या वर्षी लागणारे सर्व सामान उतरवून झाले होते. जहाजावरील शास्त्रज्ञांची थोडीफार कामे अजून बाकी होती म्हणूनच जहाज अजून मुक्कामास होते पण जहाजाचे लीडर आणि कमांडर यांनी जहाज माघारी निघण्याची तारीख ठरवुन निघण्याची तयारी सुरू केली होती. सर्व कामं आटोपल्यानंतर जहाज निघायच्या आदल्या दिवशी पुन्हा जहाजावरील सदस्यांना केंद्रातील सदस्यांतर्फे मेजवानी देण्यात आली. त्या दिवशी जहाजावरील सर्व सदस्यांनी केंद्रातच मुक्काम केला. आणि अखेर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी जहाज मैत्री केंद्राकडे मार्गस्थ झाले. जहाज ५० किलोमीटर अंतरावर दूर गेले असताना जहाजावरील सदस्यांनी रेडिओद्वारे पुनःश्च आमचा निरोप घेतला.
जहाज परतताना
जहाज परतत असताना सर्वांमध्ये दुःखी भावना होत्या. आता आम्हाला पुढच्या वर्षी जहाज येईपर्यंत आहे त्या साधनसामुग्रीमध्ये राहायचे होते. संपुर्ण जगाशी आता आमचा संबंध पुढच्या नऊ महिन्यांसाठी तुटला होता कारण विमान नोव्हेंबर २०१६ आणि जहाज जानेवारी २०१७ मध्येच येऊ शकेन याबद्दल शंका नव्हती. जहाजाच्या जाण्याने अलिखित स्वरूपात उन्हाळा संपला होता.
भारती केंद्रावर आता आम्ही फक्त तेवीस जण राहणार होतो. या पुढच्या नऊ महिन्यात आम्हाला जगाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट हेच काय ते माध्यम होते. या काळात आम्ही भारती केंद्र सोडून कुठेही जाऊ शकणार नव्हतो, ना कोणी आम्हाला घ्यायलाही येणार नव्हते. आता आम्हाला अंटार्क्टिकामधील हिवाळा अनुभवायला मिळणार होता. उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाणाऱ्या तापमानाची तीव्रता आम्ही जाणून घेणार होतो. आठवडा-आठवडा चालणारी बर्फवृष्टी, वादळे यांचा आनंद घेणार होतो. इथे दिसणारा अरोरा म्हणजे तर आमच्यासाठी आकर्षणाचे केंद्रच होता. तसेच चोवीस तासांच्या रात्री म्हणजेच ध्रुवीय रात्री अनुभवायला मिळणार होत्या. ह्या सगळ्यात थोडी खुशी आणि थोडा गम या मनस्थितीमध्ये फेब्रुवारी महिना संपला होता. Game of Thrones या टीव्ही मालिकेत असणारे एक प्रसिद्ध वाक्य सतत मनात घोंगावत होते, ते म्हणजेच Winter is coming....
मस्त लेखणी, अनुभवाचं वर्णन डोळ्यासमोर चित्र उभा करते 👌😊
ReplyDeleteधन्यवाद
Delete👌nice work
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमस्त लिखाण, उत्कंठा वाढविणारे
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteवाह.. मस्तच.. खूप माहिती देणारा लेख.. waiting for winter ...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान...
ReplyDeleteवाचताना असे वाटते की आपण स्वतः त्या स्थळावर आहोत.
धन्यवाद सर
ReplyDeleteमहेश राव ,
ReplyDeleteखरोखरंच लेखणीतून वास्तवाचे दर्शन अतिशय बोलक्या पद्धतीने मांडले आहे .
अतिशय शुध्द अशा मराठीच्या लिखाणाचीही जोड आहे तुमच्यासोबत .
इतिहास लिहिला गेला तरच तो जिवंत राहतो अन्यथा तो नाहीसा होतो .
This comment has been removed by the author.
ReplyDeleteअनोख विश्व तुम्ही जगलात.
ReplyDeleteपण तुमच्या लेखनीतुन आम्हाला ही त्या विश्वाची सफर घडवलीत.
आयुष्याची खुप मोठी शिदोरी.
अप्रतिम लेखन.❤
Nice 👏👏👌👌
ReplyDelete