Saturday, 18 April 2020

हिवाळा अंटार्क्टिकाचा - पूर्वार्ध

फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाळ्यासाठी आलेले सर्व सदस्य मायदेशी परतले होते. आमच्यासाठी हिवाळा सुरु झाला होता. आम्ही हिवाळ्याची मनाशी पूर्ण तयारी करून होतो. आता आम्ही तेवीस जण हे केंद्र पूर्ण वर्षभरासाठी सांभाळणार होतो. आपल्याकडे टीव्ही सिरीयल मध्ये एक 'बिग बॉस' नावाचा कार्यक्रम दरवर्षी दाखवला जातो. त्यात शंभर दिवस काही सदस्य एकत्र एकाच घरात राहत असतात आणि त्या सर्वांचं त्या शंभर दिवसातलं राहणीमान, वागणं, बोलणं आणि वेगवेगळे खेळ दाखवले जातात. त्याच प्रकारचा खेळ अनुभवायला आम्ही तयार होत होतो. आम्ही आता संपूर्ण जगापासून पूर्ण वेगळे झालो होतो. आहे त्या साधन-सामुग्रीमध्ये आम्हाला हिवाळा काढायचा होता. आता आम्हाला खायचं सामान आणून द्यायला ना जहाज येणार होतं ना कुठलं विमान. आजारी पडलो, हात मोडला, पाय मोडला किंवा काहीही मोठा आजार उद्भवला तरी आम्हाला इस्पितळात न्यायला ना कोणी येणार होतं ना आम्ही स्वतःहून जाऊ शकत होतो. तसं छोट्या-मोठ्या आजारांसाठी आमच्या सदस्यांमध्ये एक सदस्य डॉक्टर होते आणि त्यांना मदतनीस म्हणून एक परिचारकही होता. पण तरीही या अशा ठिकाणी त्यांना पण मर्यादा होत्या आणि आपल्याला माहित आहेच कि एक डॉक्टर सर्व आजारांवर कधीच उपचार करु शकत नाही शिवाय इथे तर उपकरणेसुद्धा मर्यादित. त्यामुळे सर्वांना आपापली काळजी स्वतःच घ्यायची होती.

आमच्यामध्ये दोन सदस्य हे आचा-याचं काम करण्यासाठी म्हणून आले होते. आता तेच आमच्या पोटाची भूक भागवणार हाते. आम्हाला रोज सकाळी साडेआठ वाजता नाष्टा, त्यानंतर दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता जेवण मिळत असे. तसं पाहिलं तर केंद्रामध्ये सर्वांत जास्त वेळ काम या दोघांनाच असे. बाकी सदस्य आपापल्या कामात ठरवलं तर चालढकल करू शकत होते पण यांना तसं करून चालणार नव्हतं कारण शेवटी सगळ्यांच्या भुकेचा प्रश्न होता. म्हणून आमच्या लीडरने दोघांना जेवण बनवायचे काम वाटून दिले होते. संपूर्ण भारतीय पद्धतीचे जेवण आम्हास मिळत असे. त्यामुळे जेवण बनवण्याचा प्रश्न सुटला होता, आता प्रश्न होता तो स्वच्छतेचा. इथे प्रत्येक जण हा काही ना काही म्हणजेच संशोधनात्मक किंवा देखभाल-दुरुस्तीचे काम करणार होता त्यामुळे घरकाम वा साफसफाईसाठी वेगळा कोणी सदस्य आमच्याबरोबर नव्हता. लीडरने बनविलेल्या तक्त्याप्रमाणे आमच्यापैकी आळी-पाळीने एक जण दर दिवशी दिवसा स्वयंपाकघरात आचाऱ्यांना मदत करत असे आणि रात्री साफसफाईची कामे करत असे. साफसफाईमध्ये स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय आदी जागांचा समावेश होता. सर्व शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, तंत्रज्ञ आणि अगदी लीडरसुद्धा ही सर्व कामे करत असत. त्याचबरोबर आमचे मोहिमेचे लीडर रोज सकाळी नऊ वाजता सर्व सदस्यांची बैठक घेत असत. या बैठकीत आजच्या दिवसात कोण काय काम करणार हे ठरत होते आणि त्याप्रमाणे दैनंदिन कामे होत होती.


रात्रीच्या वेळी चित्रित केलेले भारती केंद्राचे छायाचित्र

सगळ्या सदस्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले होते. हिवाळ्यामध्ये सर्व उपकरणे व्यवस्थित चालावीत यासाठी आम्ही अभियंतेसुद्धा कामाच्या योजना आखत होतो. केंद्रातील उपकरणे संपूर्ण हिवाळ्यात कमीत कमी बिघाड होता कशी नियमित सुरु राहतील यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीची कामे सुरु केली. त्यामुळे आमची रोजची दिनचर्या नियमित झाली होती. मार्च महिन्याअखेरीस होळीचा सण आला. या मोहिमेतील बरेचसे सदस्य उत्तरेकडील राज्यांचे असल्यामुळे होळी साजरी करायची असे ठरले. त्याची परवानगी आमच्या लीडरनी विना आढे-वेढे घेता देऊन टाकली. कोणीतरी एका सदस्याने आधीच ठरवून की काय होळीची रंगत वाढविणारे रंग सोबत आणले होते. हे रंग सर्वांनी एकमेकांना लावून संपूर्ण देशाबरोबरच होळी हा सण उत्साहात साजरा केला. आमच्या आचा-यांनी त्या दिवशी छान चमचमीत जेवण बनवले होते. 

होळीचा सण साजरा करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

असंच मागच्या महिन्यात आम्ही महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली होती. माझ्या माहितीप्रमाणे भारती केंद्रावर साजरी करण्यात आलेली ही पहिलीच शिवजयंती होती. शिवप्रतिमेचे पूजन करुन बर्फाळ प्रदेशात पारंपारिक भगवा ध्वजही आम्ही फडकवला होता. त्यावेळी आम्ही मराठी भाषिक सदस्यांनी उत्साहाच्या भरात घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरच इतर सर्व सदस्यांनी आमच्या सूरात सूर मिसळत घोषणा दिल्या. "जय भवानी ! जय शिवाजी !" "जय भवानी ! जय शिवाजी !"

शिवजयंती साजरी करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

बघता बघता कामे मार्गी लागत गेली आणि मार्च महिनाही संपला. या पूर्ण महिन्यात कामांमुळे आम्ही केंद्राच्या बाहेरही पडलो नव्हतो. रोज सकाळी ऊठून कामे करून आणि नियमित दिनचर्या पार पाडून व्यस्त दिवस गेले होते. आता कामेही फार नसल्यामुळे आम्ही तीन चार जणांचे समूह करुन बाहेर जात असू. भारती केंद्र हे समुद्र किनाऱ्यालगत  असलेल्या एका बेटावर असल्यामुळे फार लांब आम्हाला जाता येत नसे. या बेटाचे क्षेत्रफळ अंदाजे चार ते पाच वर्ग किलोमीटर इतके आहे. आता बाहेरील तापमान -१५ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले हेाते त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा बर्फ बनायला सुरुवात झाली होती. समुद्राच्या पाण्याचा पसारा मोठा असल्यामुळे आणि सततच्या वाऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा बर्फ बनण्यास वेळ लागतो. तरीही समुद्राच्या पाण्यावर खूप सारे बर्फाचे पापुद्रे जमा झाले होते. आम्ही कधी कंटाळा आला तर केंद्राच्या गच्चीमधून समुद्रावर तरंगणारे हिमनग पाहत बसत असू. इंग्रजी भाषेत सांगायचं झालं तर A million dollar view असायचा हा.

A million dollar view

मार्च अखेरच्या दिवसात सूर्य बारा तास दिसत असे आणि बारा तासांची रात्र होत असे. पण दिवसा मध्यान्हाच्यावेळी सूर्य कधीच डोक्यावर येत नसे. तो नेहमी उत्तर दिशेला ४५ डिग्री मध्ये कललेला असे. भारती केंद्रासमोरील छोट्याशा बेटावर ऊगवणारा सूर्य हिमनगांच्या क्षितिजावर जाऊन मावळत असे. मी वेळ मिळत असे तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त माझ्या कॅमेरात बंदिस्त करत असे.

भारती केंद्रापासून समोरच्या बेटावर होणारा सूर्योदय

हिमनगांच्या क्षितिजावर होणारा सूर्यास्त

एप्रिलमध्ये रोजच्या कामांबरोबरच सूर्योदय आणि सूर्यास्त पहायला जाणे हे नित्याचे झाले होते. तीन-चार दिवसाआड आम्ही चार-पाच जणांचा समूह बनवून या बेटावर फिरायला जात असू. या बेटावर एकूण सात तळी आहेत. याही तळ्यांवर पाण्याचा बर्फ मोठ्या प्रमाणावर झाला होता पण त्या बर्फावर चालणे अजूनही धोक्याचे होते. बेटावर असणा-या टेकडीवजा उंचवट्यावर जाऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत असू. इथून उत्तरेकडे पाहिल्यास बर्फाचा थर घेऊन अथांग पसरलेला समुद्र तर दक्षिणेकडे पाहिल्यास हजारो वर्ष पडून पडून साचलेल्या बर्फाची पांढरीशुभ्र् चादर असे विलोभनीय दृश्य दृष्टीस पडे. 

बर्फवृष्टी झाल्यानंतर पांढरे शुभ्र दिसणारे भारती बेटावरचे टेकडीवजा शिखर

मे महिना सुरू झाला. आता मात्र दिवस आकुंचन पावून सहा तासांचा झाला होता. तब्बल अठरा तासांची रात्र आम्ही अनुभवत होतो. साधारण सकाळी नऊ वाजता सूर्य ऊगवत असे आणि दुपारी तीनच्या सुमारास सूर्य मावळतही असे. असंच हळूहळू रात्रीचे प्रमाण वाढत चालले होते. सर्व उपकरणे सुरळीत चालत असल्यामुळे कामे फार नव्हती तरीही दिनचर्या मात्र तीच होती. एकटेपणा जाणवू नये यासाठी सर्वजण एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असू. कधी एकत्र सिनेमा बघत असू तर कधी टेबल टेनिस खेळत असू, कधी कॅरम तर कधी पत्ते आणि तीन-चार दिवसाआड केंद्राबाहेर फेरफटका मारायला जात असू. समुद्रावरचा बर्फ इतकाही घट्ट झाला नव्हता की त्यावर आम्ही चालू शकू. त्यामुळे एका बंदिस्त बेटावरचे जीवन आम्ही अनुभवत होतो. कधी कधी एक प्रकारे कारागृहामध्ये असल्याचा अनुभव येत असे. म्हणूनच की काय सर्वांचे कंटाळलेले चेहरे पाहून आमच्या लीडरने मे महिन्याच्या अखेरीस टेबल टेनिसच्या स्पर्धा आयोजित केल्या. त्या स्पर्धेमध्ये एक आठवडा असा निघून गेला.


एखाद्या अंतराळ स्थानकाप्रमाणे (Space Station) भासणारे भारती केंद्र

हिवाळा सुरु झाल्यापासूनच आम्ही सर्व सदस्य सकाळी सात ते आठ या वेळेत योगाभ्यास करत असू. सुरवातीपासूनच योगसाधना करत असल्यामुळे आम्हाला या धृवीय रात्रींमध्ये (Polar Nights) मन स्थिर राहण्यासाठी फायदा होत होता. मे महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्राच्या परिसरातील तापमान हे -२५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचले होते. केंद्राच्या बेटावरील सर्व तलाव तळापर्यंत गोठले होते. आम्ही त्या तलावांवर आता जमिनीवर चालतो तसे चालू शकत होतो. पण अशा गोठलेल्या तळ्यांवर चालताना फार काळजी घ्यावी लागत असे. कारण या बर्फावरचा स्नो जर वाऱ्यामुळे उडून गेला असेल तर हा जमलेला पूर्ण बर्फ गुळगुळीत झालेला असतो आणि खूप निसरडाही झालेला असतो.


एका गोठलेल्या तळ्यावर

रात्र पण खूप मोठी झाली होती. मेच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला फक्त एक तासाचा दिवस अनुभवत होतो. दिनचर्या मात्र घडाळ्याच्या काट्यावर नियमित चालू होती. मागच्या दोन-तीन महिन्यात मध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे आजूबाजूची सर्व बेटे, भारती केंद्राचा परिसर, समुद्रावर गोठलेला बर्फ आणि दक्षिणेकडील आईस शेल्फ हे सगळं शुभ्र् पांढरं पडलं होतं. ना कुठे झाडं ना कुठे इमारतं, ना कुठे रस्ता ना कुठे मनुष्य वस्ती. आम्ही खऱ्या अर्थाने हिवाळयांच्या मध्यान्हात प्रवेश केला होता. 


संपूर्ण पांढरा पडलेला भारती केंद्राचा परिसर

अखेर तो दिवस उजाडलाच, नाही नाही… दिवस नाही. ती होती रात्र. चोवीस तासांची रात्र. आज आमच्या इथे सूर्य उगवणारच नव्हता. मे महिना संपायला अजून तीन दिवस बाकी होते. आमच्या केंद्रावर धृवीय रात्री सुरु झाल्या होत्या. चोवीस तासांची रात्र जरी असली तरी भारती केंद्र हे समुद्रकिनारी असल्यामुळे सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊण तास आपल्याकडे तिन्हीसांजेला पडतो तसा थोड्या फार प्रमाणात उजेड पडत असे पण सूर्य मात्र उगवत नसे. पृथ्वीच्या दक्षिण धृवावर तर मार्चमध्येच चोवीस तासांची रात्र सुरु होते. या रात्रींमध्ये आणि तिथे कसल्याही प्रकारचे प्रदू्षण नसल्यामुळे अवकाशातील ग्रह-तारे स्पष्ट दिसत असत. त्यामुळे आम्ही केंद्रामधूनच खोलीच्या खिडकीमधून अवकाशातील ग्रह-तारे न्याहाळत असू. या दिवसांत केंद्राबाहेर जाऊन करायची सर्व कामे बंद झाली होती. आत्तापर्यंत नियमित सुरु असलेल्या दिनचर्येमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे रात्री खूप उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. मानसिक संतुलन आवर्जून, ठरवून व्यवस्थित ठेवावे लागत होते. काही सदस्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला होता. लगेच व्यक्त होणे किंवा एकटे-एकटे राहणे असे काही सदस्यांचे प्रकार सुरु होते. या रात्रींमध्ये काही काही सदस्य तर आठवडा-आठवडा दिसायचेच नाही, सतत आपापल्या खोल्यांमध्ये पहुडलेले असायचे. अशातच Mid-winter day दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला. दरवर्षी २१ जून या दिवशी पृथ्वी उत्तरेकडे सर्वात जास्त कललेली असते. या दिवसानंतर पृथ्वी दक्षिणेकडे कलायला सुरवात होते. म्हणून अंटार्क्टिकामध्ये २१ जून हा दिवस Mid-winter day म्हणून साजरा केला जातो. अंटार्क्टिकामधील इतर केंद्रांप्रमाणेच आम्हीदेखील Mid winter day उत्साहात साजरा केला. तसेच भारती केंद्रापासून अंदाजे नऊ ते दहा किलोमीटर पूर्वेकडे असणाऱ्या चीन आणि रशियाच्या केंद्रांना आमच्या लीडरने रेडिओवरुन शुभेच्छा दिल्या.


Mid-winter day साजरा करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

आता केंद्राबाहेर तापमान रोज -३० ते -३५ डिग्री सेल्सिअस असायचे. रात्र तर ग्रह ताऱ्यांनी उजळून निघायची. एके रात्री याच धृवीय रात्रींमध्ये सर्वांत हवीहवीशी गोष्ट बघायला आम्ही सात-आठ जण तरुण एका रात्री बाहेर पडलो. डांगरी, कानटोपी, तोंडाला बंडाणा (Buff), पायात जाड मोजे आणि त्यावर बूट घालून आम्ही बाहेर पडलो. बाहेर मस्त बर्फाचा सडा पडलेला होता. चालताना पाय अर्ध्या-पाऊण फुटापर्यंत गाडत होते. केंद्रामधल्या दिव्यांचा ऊजेड दिसणार नाही अशा ठिकाणी पण केंद्राजवळच आम्ही जाऊन थांबलो. त्या अंधारात आकाशात ऑरोरा दिसत होता. एक मोठ दिव्य होतं ते आमच्यासाठी. ऑरोरा म्हणजे आकाशात रात्रीच्या वेळी हिरव्या रंगाचा प्रकाश दिसतो. जसे आपल्याकडे पावसाळ्यात इंद्रधनुष्य पहायला मिळते, तसे अंटार्क्टिकामध्ये रात्रीच्या वेळी ऑरोरा पहावयास मिळतो. ऑरोरा म्हणजे आपल्या भारतीयांसाठी एक स्वप्नवत गोष्ट आहे कारण आपला देश पृथ्वीच्या कर्कवृत्तावर येतो त्यामुळे ऑरोरा आपल्याकडे कधीच दिसत नाही. त्या रात्री आम्ही आकाशाला नजर लावूनच बसलो होतो. सर्व सदस्य आपापले फोटो ऑरोराबरोबर काढून घेत होते. ज्या रात्री ऑरोराचा प्रभाव जास्त असेल तेव्हा आकाशात एक प्रकारचा हिरवा रंग नाचत आहे असा भास होतो. ज्या गोष्टीची आम्ही गेले सहा महिने आतूरतेने वाट पहात होतो ती गोष्ट आम्हाला आज पहायला मिळत होती. याबरोबरच आकाशातील ग्रह-तारे तर दिसतच होते पण आकाशगंगाही स्पष्ट नजरेस येत होती. या दिवसात ऑरोरा सतत दिसत असल्यामुळे आम्ही ज्या दिवशी त्याचा प्रभाव जास्त असेल तेव्हाच ऑरोरा पहाण्यासाठी बाहेर पडत असू. नंतर इतका ऑरोरा पाहिला की, आम्ही बाहेर जाण्यापेक्षा खिडकीतूनच ऑरोरा पाहणे पसंत करत असू. 

केंद्राजवळ दिसणारा ऑरोरा

आकाशगंगेसोबत चित्रित केलेला ऑरोरा

भारती केंद्रासोबत चित्रित केलेला ऑरोरा

आमच्या बरोबर हवामान खात्याचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी एकेदिवशी चहा पीत असताना 'Water creats clouds' हा एक अंटार्क्टिकाच्या वातावरणात घडणारा नैसर्गिक चमत्कार सांगितला. जेव्हा वातावरणाचे तापमान हे -२५ डिग्री सेल्सिअसच्या कमी म्हणजे -२८, -३० किंवा -३५ डिग्री सेल्सिअस वगैरे असेल तेव्हा गरम उकळलेले पाणी जर त्या थंड वातावरणात फेकले तर त्या पाण्याची लगेचच वाफ होते आणि त्याचे ढगांत रूपांतर होते. मग काय? लागलो प्रात्यक्षिक करायच्या तयारीला. यासाठी गरम पाणी एका कपात घेवून केंद्राच्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. ते गरम पाणी मोकळया हवेत भिरकावून दिले. आणि खरोखरच एक चमत्कार झाल्यासारखं त्या गरम पाण्याचे एका सेकंदाच्या आतंच ढगात रुपांतर झाले. हा सारा प्रकार चमत्कारीक पण गमतीशीर वाटला. पुन्हा प्रात्यक्षिक करण्यासाठी गरम पाणी घेवून आलो. पुन्हा हवेत पाणी भिरकावल्यावर पुन्हा ढग तयार झाला. असा गमतीशीर खेळ आम्ही दोन-तीन रात्री खेळत होतो.

गरम पाण्यापासून तयार केलेला ढग

Mid-winter असल्यामुळे त्या आठवड्यात वारेही जोरात वाहत होते. त्याच आठवड्यात एका दिवशी तापमान -३९ डिग्री सेल्सीअस इतके कमी होते आणि हे तापमान त्या वर्षातील भारती केंद्रातील सर्वात कमी तापमान म्हणून नोंदविले गेले. जसं आम्हाला हे समजलं की आज या वर्षातील सर्वात कमी तापमानाचा दिवस आहे तसं आम्ही केंद्राबाहेर जायचं ठरवलं. पूर्ण पोषाख चढवून आम्ही टेकडीवजा शिखरावर पोचलो. त्याच दिवशी वारेही जास्त प्रमाणात वाहत असल्यामुळे भासणाऱ्या तापमानाचा आकडा (Feeling Temperature) -५१ डिग्री सेल्सीअसपर्यंत गेला होता. आम्ही टेकडीवर पोचलो खरे पण अतिशय कमी तापमानामुळे श्वासोच्छवासाच्यावेळी नाकाजवळ बर्फ जमू लागला. डोळ्याच्या पापण्या, डोळ्याच्या खोबण्या यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या अंशाचादेखील बर्फ बनू लागला. त्यामुळे डोळे उघडझाप करताना त्रास होवू लागला. कोणोकोणाला डोकं गच्च होऊन बधीर झाल्यासारखे वाटू लागले. हाताची बोटे आणि पायाची बोटे थंड पडू लागली. सर्वांनाच असा त्रास होऊ लागल्यामुळे आम्ही परतायचा निर्णय घेऊन लगेचचं टेकडी उतरायला सुरवात केली. केंद्रामध्ये अत्याधुनिक कार्यप्रणालीमुळे २० डिग्री सेल्सीअस पर्यंत तापमान असते. केंद्रामध्ये आल्यावर सर्व शरीर सुरळीत व्हायला जवळपास अर्धा तास गेला खरा पण हा असा अनुभव पुन्हा होणे नाही.

-५१ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चेहऱ्यावर जमलेला बर्फ

आज तब्बल ४९ दिवसानंतर आमच्या इथे सूर्य उगवणार होता. त्याची उगवण्याची वेळ होती सकाळी ११ वाजून ५० मिनिटे. आमच्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन आलेल्या सूर्यदेवांनी आपली वेळ अचूक साधली.  आजच्या दिवशी आमच्या चोवीस तासांच्या धृवीय रात्री संपल्या होत्या. केंद्रामध्ये सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. इथून पुढे असंच सूर्यनारायण उगवणार होते आणि मावळणारही होते. पुढच्या चार महिन्यात आमच्यापैकी काही सदस्यांना मायदेशी पोचण्याची संधी मिळणार होती. त्याबाबत काही सदस्यांमध्ये सुरु असलेली चर्चाही कानावर पडत होती. अर्धा हिवाळा आम्ही उत्तमरित्या पार पाडला होता. सर्वजण खुप खूष होते. एकमेकांना हस्तांदोलन करून, गळाभेट घेऊन एकमेकांचे अभिनंदन करत होते. केंद्रामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण झाले होते. या साऱ्या कार्यक्रमातच सूर्य मावळला सुद्धा होता. पहिल्या दिवशी फक्त पंधरा मिनिटांसाठीच सूर्यदेवांनी आम्हाला दर्शन दिले होते. पण तरीही सर्वांचे चेहरे सूर्याच्या तेजामुळे उजळून निघाले होते. 

४९ दिवसानंतरचा सूर्योदय

हिवाळ्यात अजून एक मोठी गोष्ट आमच्याबरोबर घडायची राहून गेली होती. ती म्हणजे वादळ. तसे आम्ही भारती केंद्रात आल्यापासून खुप वादळे पाहिली होती पण मोठं आणि खुप दिवस चालणारं वादळ अजून पाहायला मिळालं नव्हतं. तेही दान लवकरच पावलं. धृवीय रात्रीनंतर पहिल्यांदा सूर्योदय झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच वादळाला सुरुवात झाली. वादळाबरोबरच बर्फवृष्टीदेखील सुरु झाली. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता म्हणून जोरजोरात वारे वाहत होते आणि बर्फवृष्टीपण सुरु झाली होती. तीन-चार दिवस झाले वादळ येऊन पण ते थांबायचं काय नावंच घेईना म्हणून हवामान शास्त्रज्ञांकडे विचारायला गेलो असता त्यांच्याकडून एक माहिती समजली. त्यांनी सांगितलं आज या वर्षातील वाऱ्याचा वेग हा सर्वाधिक आहे, ८७ किलोमीटर प्रतितास... माझ्या सोबत आलेल्या अभियंत्याने माझ्याकडे पाहून आश्चर्यचकित होऊन डोळेच विस्फारले. बापरे ! मग काय ? लागलो तयारीला... सोबतीला अजून तीन चार जणांना तयार केलं. धृवीय पोषाख चढवला आणि पडलो बाहेर हवा खायला. नव्हे.. वारं खायला... केंद्राचा मुख्य दरवाजा उघडला तर हे बर्फ (Snow) वाऱ्याबरोबर उडून आत आला. लगेचच बाहेर पडून दार लावून घेतलं. बाहेर soft snow सगळीकडे पसरला होता. चालताना पाय काही ठिकाणी एक फूट, काही ठिकाणी दोन फूट तर काही ठिकाणी तीन फूटांपर्यंत स्नोमध्ये आत जात होते. वाऱ्याच्या वेगामुळे स्नोचे बारीक बारीक कण उडत होते त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा-वीस फूटावरचंच दिसत होतं. त्यात वाऱ्याचा वेग हा एवढा प्रचंड की सरळ उभं कुणी राहूच शकत नव्हतं म्हणून मग सर्वजण एकमेकांना धरून चालत होतो. त्यामुळे कोणी जर एकटा मागे राहिला तर तो भरकटलाच म्हणून समजा.


८७ किमी प्रतितास असलेल्या वादळामध्ये

हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी त्यांची संशोधनाची उपकरणे केंद्रापासून २०० मीटर अंतरावर एका Hut मध्ये ठेवली होती. अशा परिस्थिती तिकडे जाण्याची वेळ आलीच तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी केंद्रापासून या Hut पर्यंत एक दोरी बांधून ठेवली होती. ह्याच दोरीचा आधार घेत आम्ही त्यांच्या Hut पर्यंत जाऊ शकलो. त्या Hut मध्ये थोडा वेळ थांबून आम्ही परत दोरी पकडत केंद्रामध्ये माघारी आलो. 

क्रमशः

20 comments:

  1. खूपच छान अनुभव 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  2. ऑरोरा म्हणजे निसर्गाचा आविष्कार... नशीबवान आहात सगळ डोळ्यांनी पाहायला मिळाला.. तुमच्या मुळे आम्ही अनुभव घेतोय .. मजा येतेय .. येऊद्या लवकरच पुढचा भाग

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुहास. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  3. अप्रतीम अनुभव सर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  4. Replies
    1. धन्यवाद सुहास. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  5. लय भारी......👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुहास. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  6. Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  7. छान.. ऑरोरा ऑस्ट्रेलिस.. आणि ते पण antarticta मधून बघण्याचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असेल!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  8. Impressive! Antartica, even name itself amaze me everytime....and all info is here with minor detailing....great nicely written!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete
  9. वाह भारी इथे पण जायचं आहे आपल्याला महेश, सुहास, संतोष , सूरज 😉

    ReplyDelete
  10. अप्रतिम फोटो..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.

      Delete